Join us

Jaydev Thackeray: एकनाथला 'एकटा नाथ' होऊ देऊ नका, शिंदेराज्य येऊ द्या; बाळासाहेबांच्या मुलाची जनतेला साद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 8:00 PM

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे.

मुंबई-

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्याच खू्र्चीवर आज जयदेव ठाकरे पाहायला मिळाले आणि त्यांनी राजकीय व्यासपीठावरुन भाषणही केलं. एकनाथला कधीच एकटा नाथ होऊ देऊ नका ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. ते जे काही कामं करत आहेत ती भल्यासाठी आहेत. सगळं बरखास्त करा आणि परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्यात, असं मोठं विधान जयदेव ठाकरे यांनी केलं आहे. 

'बाबा आजारी होते तेव्हा युवराज पबमध्ये मजा मारत होते'; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर जयदेव ठाकरे यांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आलं सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिंदे गटानं आज थेट उद्धव ठाकरे यांच्या बंधूंना व्यासपीठावर आणून मोठा धक्का दिला. जयदेव ठाकरे नुसते व्यासपीठावर आले नाहीत, तर त्यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाजूची खूर्ची दिली. तसंच जयदेव ठाकरे यांनी आपले विचारही सर्वांसमोर मांडले. 

'विभीषणाला कोणी गद्दार म्हटले नाही, एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावली'-शरद पोंक्षे

"एकनाथ हा माझा खूप आवडीचा. आता तो मुख्यमंत्री झालाय त्यामुळे एकनाथराव असं म्हणावं लागेल. मला चार-पाच दिवस झाले मला फोन येताहेत तुम्ही शिंदे गटात गेलात काय? असं विचारत होते. मी काही कुणाच्याही गोठ्यात दावणीला बांधला जाणारा नाही. पण एकनाथ शिंदेंनी चार-पाच निर्णय घेतले ते खरंच चांगले होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकनाथ शिंदेंना एकटं पाडू नका. त्यांना एकटानाथ होऊ देऊ नका. यावेळी मी एक गोष्ट सांगेन की सगळं बरखास्त करा.परत निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्यात", असं जयदेव ठाकरे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना