Join us  

व्हीआयपी कंपनीचे प्रमुख जयकुमार पाठारे अनंतात विलीन

By admin | Published: January 18, 2016 2:02 AM

प्रसिद्ध व्हीआयपी कंपनीचे प्रमुख जयकुमार पाठारे यांचे शनिवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७९ वर्षांचे होते.

कल्याण : प्रसिद्ध व्हीआयपी कंपनीचे प्रमुख जयकुमार पाठारे यांचे शनिवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, मुलगा कपिल, सुनील, मुलगी वंदना असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी गणेशघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. शहराच्या पश्चिम भागातील रामदासवाडी परिसरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे पार्थिव एका फुलांनी सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आले होेते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कल्याणचे भाजपा आमदार नरेंद्र पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू नरेशचंद्र, ब्राह्मणपाडा एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. महेश गावडे, रिक्रिएशन व्यायायशाळेचे पद्माकर कारखानीस, गौतम दिवाडकर, सुरेश रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. पाठारे यांचा जन्म ४ मे १९३४ रोजी कोल्हापुरात झाला. कोल्हापुरात त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यावर ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. त्यांनी उल्हासनगरातील शांतीनगर परिसरातील ब्राह्मणपाडा येथे राहण्यासाठी खोली घेतली. त्या वेळी तिथे दारूच्या भट्ट्या चालविल्या जात होत्या. त्यांनी त्या उद्ध्वस्त करून डॉ. गावडे यांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी ब्राह्मणपाडा एज्युकेशन सोसायटीत सुरू केली. वीज वितरण कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. नोकरी करीत असताना त्यांनी वीज वितरण कंपनीत कंत्राटदार म्हणून काम केले. तेव्हाच त्यांचा संपर्क हैदराबादच्या रेड्डी या मित्रासोबत आला. रेड्डी हे हैदराबादचे आणि पाठारे हे मुंबईचे, त्यामुळे हैदराबाद व मुुंबई या नावांचे मिश्र स्वरूप या अर्थाने हायब्रो नावाची कंपनी डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीत १९७० साली सुरू केली. १९९१ साली तिचे नामकरण मॅक्सवेल असे करण्यात आले होते. त्या वेळी जे. मॅक्सवेल यांना पुरस्कार मिळाला असल्याने कंपनीचे मॅक्सवेल हे नाव खूपच चर्चेत आले. त्यांनी व्हीआयपी अंडरवेअर नावाचा ब्रॅण्ड बाजारात आणला. (प्रतिनिधी)