मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी व्यवसाय करण्यासाठी हातगाड्यांचा वापर केला जातो. मात्र अशा अनधिकृत हातगाड्या वाहतुकीस अडथळा ठरतात. शिवाय पादचारी वर्गास चालतानाही अडथळा येतो. क्वचित प्रसंगी अपघातही ओढवतो. परिणामी मुंबई महापालिकेकडून अशा अनधिकृत हातगाड्यांवर वारंवार कारवाई केली जाते. पुन्हा परिस्थिती जैसे थेच राहते. या कारणाने मुंबई महापालिकेने यासंदर्भातील कारवाई आणखी कठोर केली. याद्वारे वाहतुकीच्या मार्गात अडथळा ठरत असलेल्या, अनधिकृतपणे उभ्या असलेल्या गाड्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली. रस्त्यांवर हातगाड्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याचे कारवाईत आढळून आले. ३० नोव्हेंबरपर्यंतच्या मागील दोन आठवड्यांमध्ये ३ हजार २५३ चारचाकी हातगाड्या पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जप्त केल्या.
मुंबई महापालिकेकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाई केली जाते. परंतु सायंकाळच्या वेळेत अन्नपदार्थांच्या हातगाड्या रस्त्यांवर उभ्या असल्याचे दिसून येते. यासंदर्भातील कारवाई आणखी वेगाने सुरू करत महापालिकेने १६ नोव्हेंबरपासून हातगाड्या जप्त करण्यास सुरुवात केली. कारवाईत सर्वाधिक ३१९ हातगाड्या अंधेरी, त्याखालोखाल कुर्ल्यात २५२ आणि चेंबूर विभागातून २१२ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या अनधिकृत चारचाकी हातगाड्या फेरीवाल्यांनी दंड जमा केल्यानंतर सोडून देण्यात येत होत्या. अथवा कोणी दावा न केल्यास लिलावात विकण्यात येत होत्या. मात्र त्या परत अनधिकृत व्यवसायांसाठी वापरल्या जातात, असे आढळून आले आहे. त्यामुळे जेसीबीद्वारे या हातगाड्या नष्ट करण्यात येणार होत्या. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.रस्ते मोकळे करण्याचा हेतूअतिक्रमण निर्मूलन व फेरीवाल्यांचे नियमन आणिअनुज्ञापन खात्याचे उपायुक्त देवेंद्र्रकुमार जैन यांच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याच्या उद्देशाने रस्ते मोकळे करण्यासाठी सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे.16 नोव्हेंबरपासून कारवाई सुरू करण्यात आली. यानुसार २ आठवड्यांत करण्यात आलेल्या धडक कारवाईदरम्यान ३ हजार २५३ चार चाकी हातगाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.