‘जेईई - अॅडव्हान्स’मध्ये महाराष्ट्राने मारली बाजी, स्मार्टफोनपासून दूर राहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 05:30 AM2019-06-15T05:30:34+5:302019-06-15T05:31:27+5:30
कार्तिकेय गुप्ता देशात प्रथम; मुंबईची तुलीप पांडे राज्यात मुलींमध्ये प्रथम
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमध्ये प्रवेशासाठी झालेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेत (जेईई - अॅडव्हान्स) कार्तिकेय गुप्ता प्रथम आला. तो मुंबईत असून मूळचा चंद्रपूरमधील बल्लारपूरचा आहे. तर, मुलींमध्ये झोनवाईस टॉपर्समध्ये अहमदाबादची शबनम सहाय प्रथम आली असून तिचा आॅल इंडिया रँक १० आहे.
मुंबई विभागात गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा या राज्यांचा समावेश होतो. मुंबई विभागातून कार्तिकेय गुप्ता (एआयआर -१), कौस्तुभ दिघे (एआयआर - ७), शबनम सहाय (एआयआर- १०), आदित्य भास्कर (एआयआर- १८), अंकित कुमार मिश्रा (एआयआर -३२ ) यांनी पहिल्या ५ मध्ये स्थान मिळविले. मुंबईच्या तुलीप पांडे हिने राज्यात मुलींमध्ये प्रथम आली असून तिचा आॅल इंडिया रँक ७९ आहे.
मुलींमधून प्रथम आलेल्या शबनमला ३०८ गुण मिळाले. कौस्तुभ मूळचा इंदूरचा असून सुरत येथून परीक्षा दिली होती. कौस्तुभचा आॅल इंडिया रँक ७ आहे. आॅल इंडिया रँक ३२ असलेला अंकितकुमार मिश्रा कांदिवलीमध्ये राहतो.
आयआयटी बॉम्बेमध्ये कॉम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश मिळाल्याने मी निश्चिंत होतो. पण, देशात पहिला क्रमांक येईल, असा मी विचारही केला नव्हता. नियमित लेक्चरनंतर ६ ते ७ तासांचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करून मी अभ्यास केला आणि शिक्षकांनी नेहमीच मदत केली.
- कार्तिकेय गुप्ता (आॅल इंडिया रँक - १)
मी नववीपासूनच खरेतर जेईई अॅडव्हान्ससाठीची तयारी सुरू केली होती. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे शेवटी यश मिळवू शकले. पुढे काय करायचे याबद्दल अजून विचार केलेला नाही.
- शबनम सहाय, (आॅल इंडिया रँक - १०)
मी दोन वर्षांचा इंटिग्रेटेड क्लास करत अभ्यास केला. माझ्या यशात माझे कुटुंबीय आणि शिक्षक यांचा वाटा आहे. भविष्यात मला आयआयटी मुंबईत कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे. मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलसोबत सॉफ्टवेअर रिसर्चर म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे.
- तुलीप पांडे (आॅल इंडिया रँक - ७९)
अभ्यासाची उजळणी आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मी हे यश मिळवू शकलोे. सध्या तरी आयआयटी बॉम्बेमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश मिळविण्याचे ध्येय आहे.
- कौस्तुभ दिघे (आॅल इंडिया रँक - ७)
मला आयआयटी बॉम्बेमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे. भविष्यात संशोधनात काम करण्याची इच्छा आहे.
- अंकितकुमार मिश्रा (आॅल इंडिया रँक - ३२ )
स्मार्टफोनपासून दूर राहा अन् स्मार्ट बना - कार्तिकेय
सीमा महांगडे
मुंबई : जिद्द, मेहनत, चिकाटीने मन शांत ठेवून अभ्यास केला. स्मार्टफोन व सोशल मीडियापासून दूर राहा आणि अथक परिश्रमपूर्वक अभ्यास करत ‘स्मार्ट’ बना असा मंत्र कार्तिकेय गुप्ता याने दिला.
कार्तिकेयचे वडील चंद्रेश गुप्ता हे येथील बल्लारपूर पेपर मिलमध्ये महाव्यवस्थापक आहेत. आई पूनम गुप्ता या गृहिणी असून त्या बॉटनीत एमएससी झाल्या आहेत. भाऊ मुंबईला विद्या भवन पटेल इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलाजी येथे इंजिनियरिंग शिकत आहे.
गणितज्ञ रामानुजन माझे आदर्श आहेत. कारण त्यांनी कोणतीही आधुनिक साधने हाताशी नसताना गणितामध्ये खूप मोठे योगदान दिल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, २ वर्षे मुंबईत, कुटुंबापासून दूर असलेल्या कार्तिकेयने स्मार्टफोनचा वापर केला नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रश्नच नसल्याचे त्याने स्पष्ट केले. कुटुंबाशी बोलण्यासाठी मी साधा फोन वापरला. स्मार्टफोनचा उपयोग अभ्यासासाठी निश्चितच होऊ शकतो. मात्र, त्याची सवय लागल्यास अभ्यासावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.