जेईई मुख्य परीक्षा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:22+5:302021-05-05T04:09:22+5:30
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य; २४ मे ते २८ मेदरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य; २४ मे ते २८ मेदरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए ) २४ ते २८ मेदरम्यान होणारी जेईई मुख्य परीक्षा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांसाठी जेईई मुख्य परीक्षा वर्षातून चार विविध सत्रांत घेतली जाते. यंदा ४ सत्रांपैकी फेब्रुवारी (२३ ते २६ फेब्रुवारी) आणि मार्च (१६ ते १८ मार्च) अशा दोन सत्रांची परीक्षा झाली आहे. मात्र कोरोना संसर्गाचा देशातील वाढता आलेख पाहून आणि पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मागील महिन्यात एप्रिल, तर या महिन्यात मेमधील सत्रात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग परीक्षेच्या तयारीसाठी करावा, एनटीए अभ्यास ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घरातच बसून अधिकाधिक मॉक टेस्टचा सराव करावा, अशी मार्गदर्शक सूचना एनटीएने केली आहे.
* कंपनी सेक्रेटरीच्या परीक्षाही लांबणीवर
देशातील कोरोना वाढता संसर्ग पाहता इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाकडून १ ते १० जूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या, फाउंडेशन प्रोग्रॅम, एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम आणि प्रोफेशनल प्रोग्रॅम अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाकडून पत्रक जारी करण्यात आले असून, परीक्षेच्या सुधारित तारखांच्या किमान महिनाभर आधी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येईल, असे जॉईंट सेक्रेटरी डॉ. संजय पांडे यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.
.....................