- मनोहर कुंभेजकर
मुंबई- मालाड पश्चिम येथील डेंजरस झाेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्सा बीचवर जेलीफिशचा प्रादुर्भाव गेल्या तीन दिवसांपासून सुरुच आहे. आज याठिकाणी जवळपास 500 पर्यटक आले होते, त्यापैकी सुमारे 15 पर्यटकांना जेलीफिशने डंख मारला आहे. गेल्या शनिवारी येथे 50 पर्यटकांना, तर काल 6 पर्यटकांना जेलीफिश चावले होते. काल रविवार सुट्टीचा दिवस असला तरी दिवसभरात 6 पर्यटकांना जेलीफिश चावले होते. मात्र, आज येथे पर्यटकांची संख्या कमी असली तरी 15 पर्यटकांना जेलीफिशने डंख मारला. जेलीफिशचा हा सिलसिला येत्या गणेशोत्सव संपेपर्यत सुरू राहील. त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी केले आहे.लोकमतच्या वृतांची दाखल घेत जेलीफिशवर रामबाण उपाय करण्यासाठी काल दुपारपासून अक्सा बीचवर 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सज्ज झाली आहे. त्यामुळे जेलीफिशने डंख मारलेल्या 6 पर्यटकांना येथील रुग्णवाहिकेत नेऊन त्यांच्यावर येथील डॉक्टरांनी उपचार केले. त्यामुळे त्यांना थोडा आराम वाटला. तर सकाळ पासून सायंकाळपर्यंत पाण्यात उतरू नका, अशा सूचना आम्ही माईक वरून पर्यटकांना करत होतो. मात्र येथील पर्यटकांनी आमच्या सूचनांचे पालन केले, तर ज्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि पाण्यात गेले त्यांच्यावर जेलीफिशने डंख मारला, अशी माहिती येथील जीवरक्षकांनी दिली.दरम्यान येथे जेलीफिशचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पर्यटकांना पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी अकसा बीचवर पोलीस यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी मच्छिमार नेते किरण कोळी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली आहे.