Join us

अक्सा बिचवर 50 जणांना जेलीफिशचा चावा; पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 8:02 PM

जीवरक्षकांच्या सूचनेकडे पर्यटकांचं दुर्लक्ष

- मनोहर कुंभेजकरमुंबई : गिरगाव, जुहू चौपाटीवर गेल्या आठवड्यात जेलीफिश आढळले होते. गिरगाव चौपाटीवर पाच जणांना जेलीफिशने डंख मारला होता. त्यानंतर, शनिवारी मालाड पश्चिमेकडील आक्सा बीचवर पन्नास जणांना जेलीफिशने डंख मारल्याची माहिती निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर व जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी यांनी दिली. त्यामुळे मुंबईच्या समुद्रकिनारी जेलीफिशचा उपद्रव वाढल्याचे चित्र आहे.आक्सा बीचवर तैनात मुंबई अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी ‘पाण्यात जाऊ नका’ असे आवाहन पर्यटकांना केले होते. मात्र, पर्यटकांनी दुर्लक्ष केले. परिणामी, ही घटना घडली. जीवरक्षक रजनीकांत माशेलकर, नथुराम सूर्यवंशी, प्रवीण चव्हाण, गणपती कोळेकर, समीर कोळी, प्रीतम कोळी, सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी राहुल रणदिवे व विनोद जयस्वाल यांनी जखमी झालेल्या ५० जणांना मदत केली. त्यांच्यावर प्रथमोपचार केले. जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. शनिवारी आक्सा बीचवर दिवसभर लाइट नसल्यामुळे जीवरक्षकांची सूचना देणारी माइक व्यवस्था बंद होती, शिवाय येथे सावधानतेचे फलकही लावण्यात आलेले नाहीत. येथे प्रथमोपचार, तसेच कोणतेच औषध उपलब्ध नसल्याचे उघडकीस आले आहे.प्रभावी यंत्रणा राबवावीआक्सा बीचवर ५० जणांना जेलीफिशने डंख मारल्याची माहिती ‘लोकमत’कडून मिळताच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तातडीने याची दखल घेतली. याबाबत त्यांनी सांगितले, जेलीफिशवर प्रतिबंधात्मक यंत्रणा राबवावी, असे आवाहन पालिका आयुक्त अजय मेहता यांना केले आहे. गिरगाव, जुहू आणि आता आक्सा बीचवर मोठ्या प्रमाणात जेलिफिश आल्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सावधानता म्हणून मुंबईच्या बीचेसवर नागरिकांनी पाण्यात उतरू नये आणि घ्यावयाची काळजी यासंदर्भातील माहितीपर सूचना फलक लावण्यात यावेत. नागरिकांनी पाण्यात उतरू नये, अशा घोषणा मेगाफोनवरून नागरिकांना देण्यात याव्यात, अशा सूचना महापौरांनी केल्या आहेत.दरम्यान, जेलीफिशने डंख मारल्यावर त्यावर प्रभावी ठरणारी औषधे पालिका रुग्णालयात तसेच बीचेसवर उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचनाही प्रशासनाला केल्याची माहिती महापौरांनी दिली.

टॅग्स :मुंबई