चौपाट्यांवर जेलीफिशचे संकट, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 01:49 AM2018-08-06T01:49:19+5:302018-08-06T01:49:29+5:30
मुंबई शहरातील गिरगाव चौपाटी, जुहू बीच, वर्सोवा बीच, अक्सा बीच, दादर चौपाटी अशा सर्व समुद्रकिनारी रविवारी दिवसभर जेलीफिश आढळल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
- मनोहर कुंभेजकर/सागर नेवरेकर ।
मुंबई : मुंबई शहरातील गिरगाव चौपाटी, जुहू बीच, वर्सोवा बीच, अक्सा बीच, दादर चौपाटी अशा सर्व समुद्रकिनारी रविवारी दिवसभर जेलीफिश आढळल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई समुद्रकिनारी जेलीफिश आढळल्याच्या बातम्या माध्यमातून झळकू लागल्याने रविवार असूनही जेलीफिशच्या भीतीने मुंबईतील चौपाट्यांवर फारशी गर्दी नव्हती. याचा मोठा फटका या चौपाट्यांवर असलेल्या दुकानदारांना बसला. रविवार असूनही गर्दी नसल्याने त्यांच्या व्यवसायावर याचा विपरीत परिणाम झाला. तर दुसरीकडे अक्सा बीचवर ५० जणांना आणि गिरगाव चौपाटीवर ५ जणांना जेलीफिशने डंख केल्याच्या घटना घडल्या.
गिरगाव चौपाटीवर गुरुवारी ब्लू बॉटल जेलीफिशने तीन लहान मुले आणि दोन तरुणांना डंख केल्याची घटना घडली होती. गिरगाव चौपाटीवरील जीवरक्षकांकडून सतत पर्यटकांना सूचना आणि जेलीफिशबद्दल माहिती आणि सतर्कतेचा इशारा दिला जातो. परंतु काही पर्यटक याकडे दुर्लक्ष करून पाण्यामध्ये उतरतात. परिणामी जेलीफिशकडून डंख केल्याची घटना घडते. नागरिकांनीही सतर्क राहून आपले संरक्षण करणे गरजेचे
आहे, अशी माहिती गिरगाव चौपाटीवरील जीवरक्षक विशाल चव्हाण यांनी दिली.
मालाड येथील अक्सा बीचवर शनिवारी दिवसभरात ५० पर्यकटांना डंख मारल्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोन महिलांवर अक्सा बीचवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकेतच प्राथमिक उपचार करण्यात आले.
या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. जेलीफिशच्या बातमीची दखल घेत मुंबईच्या सर्व समुद्रकिनाºयांवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्तांनी यावर प्रभावी उपाययोजना करावी, असे आवाहन केले आहे. तसेच गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांनी विशेषकरून समुद्रात उतरताना काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
वर्सोवा बीचचे स्वच्छतादूत अफरोज शाह यांनी सांगितले की, वर्सोवा बीचवरदेखील ब्लू जेलीफिश आढळून आले. पावसाळ्यात जेलीफिश ही समुद्रकिनाºयावर येतात. परंतु नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे. जर का आपण त्यांच्या परिसरात जाणार तर साहजिकच डंख करणार. आम्ही आमच्या बीच स्वच्छता मोहिमेंतर्गत जनजागृतीचे काम करत आहोत. मात्र नागरिकांनी सहकार्य करीत समुद्रात उतरताना पुरेशी दक्षता घ्यावी.
>‘बीज प्लीज’ स्वच्छता मोहीम
दादर चौपाटीवर दर रविवारी बीज प्लीज मोहिमेंतर्गत स्वच्छता मोहीम राबविली जाते. रविवारी मोहिमेंतर्गत सहा टन कचरा जमा करण्यात आला. कचरा जमा करताना स्वयंसेवकांना किनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’ जेलीफिश आढळून आले. दरम्यान, स्वच्छता मोहिमेला विद्यालंकार स्कूल आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, सिडनहॅम महाविद्यालयातील एनएसएस विद्यार्थी आणि बीच वॉरियर स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
>महापालिकेचे चुकीचे सूचना फलक
शहरातील समुद्रकिनाºयांवर जेलीफिशचे वातावरण पसरू लागल्याने दक्षतेखातर महापालिकेने सूचना फलक किनाºयावर लावले आहेत. परंतु या सूचना फलकामध्ये गणेश विसर्जनाबद्दल बरीच माहिती दिली आहे. तसेच इल (वाम) आणि स्टिंग रे (पाकड) यांचीही माहिती दिली आहे. परंतु सध्या किनाºयावर ब्लू बॉटल जेलीफिश पर्यटकांना डंख करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात गणपती उत्सवात लावले जाणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत. प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळ करत आहेत, अशी माहिती समुद्री जीव अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी दिली.
>मच्छीमारांनी
सुचविले उपाय
मच्छीमार नेते किरण कोेळी व कृष्णा कोळी यांनी किनाºयावर जेलीफिश दिसला की चप्पल घालून जेलीफिशचा फुगा तोडण्याचे प्रात्यक्षिक या वेळी अक्सा बीचवरील सुरक्षारक्षकांना करून दाखविले. जेलीफिशचा फुगा फुटला की जेलीफिश मरतो. तसेच जेलीफिशने डंख मारल्यास समुद्राच्या पाण्याने डंख मारलेल्या जागेवर स्वच्छ धुऊन घ्यावे आणि त्यानंतर त्यावर गायीचे शेण लावल्यास आराम मिळतोे असे उपाय कोळी बंधूंनी सुचविले.
>चौपाटीवरचा
व्यवसाय ठप्प
समुद्रकिनाºयांवर जेलीफिशच्या डंखामुळे पर्यटकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. त्यामुळे मुंबईच्या किनाºयावर पर्यटकांची गर्दी ओसरताना दिसून येते. याचा परिणाम किनाºयालगत आपला व्यवसाय थाटून बसलेल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.