- मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-आज सकाळी जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट टार बॉल्स आले आहेत.येथे टार बॉल येण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. गेल्या शुक्रवारी येथे जेली फिश आले होते.या संदर्भात सर्वप्रथम वृत्त लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मध्ये प्रसिद्ध झाले होते.
आज सकाळी देखिल जुहू बीच वर येथे जेली फिश आले आहेत.परिणामी संपूर्ण जुहू बीच वर आज मोठ्या प्रमाणात तेलकट टार बॉल आणि जेली फिशचे साम्राज्य आहे. सी गार्डीयन लाईफ गार्ड असोसिएशनचे संस्थापक सुनील कनोजिया यांनी लोकमतला दिली.
आज सकाळी जुहू बीचच्या किनाऱ्यावर जेलिफिश मोठ्या प्रमाणात आल्याने पर्यटकांनी जुहू चौपाटी सह अन्य चौपाट्यांवर समुद्रात पाण्यात उतरू नका ब्ल्यू बॉटल जेली फीश पासून स्वतः ला वाचवावे.तर नागरिकांनी अनवाणी पाण्यात उतरू नये,समुद्रकिनारी फिरू नये असे आवाहन कनोजिया यांनी केले आहे.
त्यामुळे नागरिकांनी जुहू बीच वर आपला रोजचा बीच वॉक घेवू नये असे आवाहन त्यांनी लोकमतच्या माध्यमातून येथे येणाऱ्या पर्यटकांना केले आहे.
दरवर्षी भरतीच्या लाटांमुळे असे टार बॉल्स मोठ्या प्रमाणावर जुहू आणि गिरगाव किनाऱ्यावर वाहून येतात. २०१९ मध्ये, वर्सोवा आणि दादर समुद्रकिनाऱ्यांवर तसेच मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावरही टारबॉलची नोंद झाली होती.गेल्या पाच वर्षांपासून मुंबई किनारपट्टीवर किनाऱ्यावर टारबॉलच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे असे मत रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका स्वप्नजा मोहिते यांनी व्यक्त केले.
टार बॉल्स म्हणजे काय ?
समुद्राच्या पृष्ठभागावर पसरलेले क्रूड ऑइल लाटांमुळे घुसळले जाऊन तसेच पाण्यातील घटकांची रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर या टार बॉल्समध्ये होते. पावसाळ्यात किनाऱ्याकडे ढकलले गेल्याने हे चिकट गोळे वाळूवर फेकले जातात आणि त्याचा थर वाळूवर जमा होतो. जेव्हा ते वाळू आणि कचरा यांत मिसळतात, तेव्हा त्यांना काढणे अत्यंत कठीण होते. जेव्हा क्रूड ऑइल समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगते तेव्हा त्याची भौतिक वैशिष्ट्ये बदलतात. गळतीच्या पहिल्या काही तासांमध्ये, तेल पातळ स्लीकमध्ये पसरते. वारा आणि लाटा यांच्यामुळे या ऑइल स्लिक खूप विस्तृत क्षेत्रात विखुरलेल्या जातात. विविध भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया तेलाचे स्वरूप बदलतात. या प्रक्रियांना साधारणपणे "वेदरिंग" म्हणतात. सुरुवातीला या ऑइल स्लिक मधील हलक्या द्रव्यांचे बाष्पीभवन होऊन जाते. पण यातील जड द्रव्यांचे चॉकोलेट पुडिंगसारखे इमल्शन तयार होते. हे अतिशय घट्ट आणि चिकट असते. लाटा आणि वर यामुळे हे इमल्शन घुसळले जाऊन त्याचे लहान मोठे टार बॉल्स तयार होतात अशी माहिती स्वप्नजा मोहिते यांनी दिली.