ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - एम्स्टरडॅमहून टोरंटोकडे जाणा-या जेट एअरवेजच्या विमानाचा मागचा भाग जमिनीला घासला. त्यामुळे पायलटला परत एम्स्टरडॅमला विमान उतरवावं लागलं आहे. जेट एअरवेजच्या या बोईंग 777-300 ईआर विमानात 352 प्रवासी होते. सर्व प्रवासी आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती जेट एअरवेजनं दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार एम्स्टरडॅमहून टोरंटोला उड्डाण घेण्याच्या वेळी विमानाचा मागचा भाग जमिनीला घासला आणि त्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यामुळे पायलटला दबावाखातर विमान पुन्हा एम्स्टरडॅमला आणावं लागलं आहे. जेट एअरवेजच्या प्रवक्त्याच्या मते, विमान 9 डब्ल्यू 234 उड्डाण घेत असतानाच त्याचा मागचा भाग जमिनीला घासल्यानं विमानाला पुन्हा एम्स्टरडॅमला आणावं लागलं आहे. कंपनीनं प्रवाशांना झालेल्या असुविधेबाबत माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जेट एअरवेजच्या विमानाचा लँडिंगच्या वेळी टायर फुटल्याची घटना समोर आली होती. ती घटना दिल्ली एअरपोर्टवर घडली होती.