मुंबई : जेट एअरवेज बंद झाल्याचा फटका देशांतर्गत व परदेशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. तिकीट दरात प्रचंड वाढ झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विदेशात अनेक ठिकाणी जाण्यासाठी जेट एअरवेजची थेट सेवा उपलब्ध होती. मात्र ती बंद झाल्याने आता प्रवाशांवर पर्यायी विमान कंपन्यांनी प्रवास करण्याची वेळ आली असून त्यासाठी पूर्वीपेक्षा तब्बल तीन ते चार पट अधिक किंमत मोजावी लागत आहे. लंडन व अॅमस्टरडॅमसारख्या ठिकाणी जाण्यासाठी थेट विमान सेवेचा पर्याय अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने प्रवाशांच्या प्रवास वेळेतदेखील मोठी वाढ झाली आहे.दरम्यान, नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) देशांतर्गत प्रवासाच्या दरांवर लक्ष ठेवले असून जास्त दराने तिकीट विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासावर नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही.जेटची सेवा बंद झाल्याने त्याचा ताण इतर कंपन्यांवर आला असून त्या कंपन्यांनीदेखील प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत तिकीट दरात प्रचंड वाढ केली आहे. या कंपन्यांचा आर्थिक फायदा होत असला तरी प्रवाशांना मात्र मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मुंबई ते लंडन प्रवासासाठी साधारणत: ३८ ते ५० हजार रुपये दर होता. मात्र, जेटच्या सेवेला घरघर लागल्यानंतर हाच दर आता तब्बल२ लाख रुपयांपर्यंत गेला आहे.दुसरीकडे, जेट एअरवेजमध्ये तिकीट आरक्षित केलेल्यांना दुहेरी फटका बसला आहे. उड्डाण रद्द झाल्याने दुसºया विमानाने प्रवास करायचा झाल्यास त्यासाठी त्यांना आता जास्त रक्कम मोजावी लागत आहे; आणि प्रवास रद्द केल्यास हॉटेल, व्हिसा व इतर बाबींचे केलेले आरक्षण रद्द केल्यास थेट ५० टक्के रक्कम कापून घेण्यात येत असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.‘इंडिगो’समोरील आव्हानांत भर,डीजीसीएचे सुरक्षा तपासणीसाठी निर्देशइंडिगोच्या ए ३२० निओ विमानांची सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले आहेत. त्यामुळे इंडिगोसमोरच्या अडचणींत भर पडली आहे. प्रॅट अॅण्ड व्हिटनी इंजीन असलेल्या ए ३२० निओ विमानांमध्ये इंजिनाबाबत अनेक समस्या उद्भवल्या होत्या व गेल्या काही काळात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.इंडिगो व गो एअरच्या ए ३२० विमानांमध्ये हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची जानेवारीपासून १८ प्रकरणे समोर आली आहेत.
जेट एअरवेजवरील संकटामुळे विमान प्रवास महागला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:39 AM