Join us

जेट एअरवेजने काढली नोकरभरतीची जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुन्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न प्रलंबित असताना, जेट एअरवेजच्या नव्या व्यवस्थापनाने नोकरभरतीची जाहिरात काढल्याने हवाई ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुन्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न प्रलंबित असताना, जेट एअरवेजच्या नव्या व्यवस्थापनाने नोकरभरतीची जाहिरात काढल्याने हवाई वाहतूक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे साडेतीन हजारांहून अधिक जुने कर्मचारी नोकरीसाठी आस लावून बसले आहेत, तर दुसरीकडे नवी माणसे रुजू करून घेतली जात असल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जेटच्या नव्या व्यवस्थापनाने पायलट आणि केबिन क्रू मेंबरच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे. केवळ अनुभवी व्यक्तींनी अर्ज करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया जलदगतीने पार पाडून जेट एअरवेजची उड्डाणे लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस या जाहिरातीतून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, जवळपास साडेतीन हजारांहून अधिक जुने कर्मचारी नोकरीच्या प्रतीक्षेत असताना, नवी भरती प्रक्रिया राबविण्याचा अट्टाहास का, असा सवाल माजी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

एका माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, साडेतीन हजारांपैकी केवळ ५० जुन्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे. अन्य कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत घेण्यास कंपनीने असमर्थता दर्शविली आहे. प्रतीक्षेत असलेले बहुतांश कर्मचारी हे कार्यालयीन कामकाज पाहणारे अथवा ग्राउंड स्टाफ आहेत. प्रत्यक्ष विमानात सेवा देणारे बरेच कर्मचारी अन्य कंपन्यांत रुजू झाले आहेत. त्यामुळे उड्डाण सुरू करायचे असल्यास विमान कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार असल्याने ही भरती केली जात आहे.

दुसरीकडे माजी कर्मचाऱ्यांसाठी ‘कालरॉक - जालान’ यांनी आणलेला पुनरुज्जीवन प्रस्तावही रेंगाळ्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी ९५ टक्के कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक होती. मात्र, तुटपुंज्या मदतीमुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यास आक्षेप घेतला. या विरोधात कर्मचारी संघटनांनी कामगार न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने नवा प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू केल्याचे कळते. या संदर्भात जेटच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

...........

नोकरीची खात्री नाहीच

- २०१९ मध्ये जेट एअरवेज बंद झाली, तेव्हा २० हजारांहून अधिक कर्मचारी सेवेत होते. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांनी कंपनी पुन्हा सुरू होण्याची आशा सोडून इतरत्र नोकरी पत्करली. आजमितीस ३,५०० कर्मचारी या कंपनीशी निगडित आहेत.

- नव्या व्यवस्थापनाने अलीकडेच जारी केलेल्या निवेदनात ‘आपल्यापैकी प्रत्येक माजी कर्मचाऱ्याला जेट २.० मध्ये पुन्हा नोकरी मिळेलच याची खात्री देऊ शकत नाही,’ असे म्हटले आहे.