Join us

मुंबई आणि दिल्ली विमानतळावर ‘स्लॉट’साठी जेट एअरवेजची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जेट एअरवेजची २०१९मध्ये बंद झालेली सेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रीय कंपनी विधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जेट एअरवेजची २०१९मध्ये बंद झालेली सेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने हिरवा कंदील दाखवला. मात्र, पुरेसे स्लॉट (विमाने उभी करण्याची जागा) मिळाल्याशिवाय ‘डीजीसीए’कडून परवाना मिळणार नसल्याने मुंबईसह दिल्ली विमानतळावर जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी जेटच्या नव्या मालकांनी धडपड सुरू केली आहे.

‘जेट १.०’चे मुख्यालय मुंबईत होते आणि त्यांच्या विमानांचा मुख्य तळही टर्मिनल २ वर होता. मात्र, २०१९मध्ये आर्थिक कारणांमुळे जेटची सेवा बंद केल्याने अन्य विमान कंपन्यांना या स्लॉटचे वाटप करण्यात आले. दुसरीकडे कालरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालान यांच्या पुनरुज्जीवन प्रस्तावाला मंजुरी देताना त्यांना जुन्या स्लॉटवर दावा करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू करण्याआधी त्यांना प्रमुख विमानतळांवर स्लॉटचा बंदोबस्त करावा लागणार आहे.

त्या अनुषंगाने जेटच्या नव्या मालकांनी मुंबई आणि दिल्ली विमानतळांवर जास्तीत जास्त स्लॉट उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई विमानतळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने ती चुकविल्याशिवाय नवे स्लॉट मिळण्यातही अडचणी येणार आहेत. ही शक्यता लक्षात घेऊन जेटच्या प्रतिनिधींनी थकबाकीवरील रकमेत थोडीफार सूट मिळते का, या दिशेने बोलणी सुरू केली आहेत.

मुंबई आणि दिल्ली विमानतळावर मिळून १२० कोटींहून अधिक पार्किंग शुल्क जेटने थकवले आहे तर एकूण थकबाकी ही २०० कोटींच्या घरात असल्याचे कळते. या थकीत रकमेबाबत तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. कारण त्यावरून स्लॉटचे भवितव्य ठरणार आहे. स्लॉट मिळाल्यानंतर किती विमानतळांवरून सेवा सुरू करायची, कोणकोणत्या शहरांना जोडायचे, याचा निर्णय घेता येणार आहे. शिवाय मार्गिका ठरल्यानंतर कोणत्या प्रकारची विमाने ताफ्यात दाखल करायची, याचा निर्णय घेता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया सप्टेंबर २०२१पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य जेटच्या नव्या मालकांनी ठरवले आहे.

मुंबईत टर्मिनल १ वर जागा मिळणार?

- पहिल्या टप्प्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जेट एअरवेजची प्रतिदिन ३० उड्डाणे सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यासाठी टर्मिनल १ वर जागा मिळण्याची शक्यता आहे. कारण जेटचे पूर्वीचे स्लॉट अन्य विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.

- एप्रिल २०१९पर्यंत टर्मिनल २ वरून दिवसाला जेटची १२५ ते १४० विमाने आकाशात झेपावायची. उड्डाणसंख्या वाढल्यास पुढील टप्प्यात टर्मिनल २ वर जागा मिळू शकते, असे सुत्रांनी सांगितले.