पुढील वर्षी जेट एअरवेजचे टेकऑफ? १०० हून अधिक विमाने सेवेत उतरविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 08:13 AM2021-12-19T08:13:43+5:302021-12-19T08:14:13+5:30
लवकरच जेट एअरवेजची देशांतर्गत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सहा नॅरो बॉडी विमानांसह लवकरच जेट एअरवेजची देशांतर्गत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून, येत्या पाच वर्षांत १०० हून अधिक विमाने सेवेत दाखल करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती जलान-कालरॉक यांच्या संयुक्त समितीने दिली. शिवाय कर्ज निराकरण योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याचा मानस असल्याचे जेटच्या नव्या मालकांकडून स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जून महिन्यात पुनरुज्जीवन प्रस्तावास मान्यता दिली असली तरी मागील सहा महिन्यांत जेट एअरवेजची सेवा सुरू करण्यासंदर्भात फारशा हालचाली होताना दिसल्या नाहीत. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाल्याने जलान आणि कालरॉक यांच्या संयुक्त समितीने त्यांच्या योजनेबाबत माहिती जाहीर केली आहे.
त्यानुसार, पुनरुज्जीवन प्रस्तावाची जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी समितीने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाशी संपर्क साधला आहे. २०२२ मध्ये देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी कर्मचारी, कर्ज देणाऱ्या संस्थांसह सर्व भागधारकांची थकबाकी चुकविण्याचा मानस आहे.
उड्डाण परवान्याचे काय झाले?
- प्रस्तावास मान्यता मिळताच ऑगस्टमध्ये ‘एअर ऑपरेटर’ प्रमाणपत्राच्या पुनर्प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी सातत्याने हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या संपर्कात आहोत.
- जुन्या कंपनीचा परवाना २०२३ पर्यंत वैध आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीमुळे २०१९ मध्ये तो निलंबित करण्यात आला होता.
उन्हाळी हंगामात मुहूर्त?
मुंबई आणि दिल्ली विमानतळावर स्लॉट, पायाभूत सुविधा आणि रात्रीच्या पार्किंग सुविधेसाठी अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली जात आहे. २०२२ च्या उन्हाळी वेळापत्रकात आम्हाला स्लॉट मिळतील, अशी आशा असल्याचे जलान-कालरॉक यांच्या संयुक्त समितीतर्फे सांगण्यात आले.