मुंबई : आर्थिक संकटामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे, असे आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना दिले. शेलार यांनी नुकतीच पुरी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली.
जेट एअरवेजच्या कर्मचाºयांना थकीत वेतन मिळण्याबाबत सरकारने प्रक्रिया जलद करावी, जेट एअरवेज अथवा बँकेला आरबीआयच्या माध्यमातून योग्य तो निर्णय देण्यासाठी प्रयत्न करावेत, कर्जात बुडालेल्या एअर इंडियाचे सक्षमीकरण करण्यासाठी उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्या शेलार यांनी पुरी यांच्याकडे केल्या.
अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आझम या वेळी उपस्थित होते. जेटबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता पुरी यांनी वर्तवली. त्यामुळे जेटच्या कर्मचाºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.