Join us

जेट एअरवेजची निधीसाठी धावाधाव, ४०० कोटी देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:20 AM

आर्थिक अरिष्टातील जेट एअरवेजने अवघ्या पाच विमानांसह देशांतर्गत विमानसेवा सुरू ठेवली आहे.

मुंबई : आर्थिक अरिष्टातील जेट एअरवेजने अवघ्या पाच विमानांसह देशांतर्गत विमानसेवा सुरू ठेवली आहे. या आर्थिक संंकटातून बाहेर पडण्यासाठी जेट प्रशासन निधी मिळवण्यास धावाधाव करत आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. ४०० कोटी रुपये आणीबाणीची मदत मिळावी, अशी कंपनीची मागणी आहे.सोमवारी या प्रकरणी व्यवस्थापन व स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) बैठकीत तोडगा निघाला नसल्याने मंगळवारी कंपनीच्या प्रशासनासोबत संचालक मंडळाची बैठक झाली. तातडीचा उपाय म्हणून १५०० कोटी रुपये उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर जेट एअरवेज तात्पुरती बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. हवाई वाहतूक विभागाचे सचिव प्रदीप सिंग खरोला यांनी सांगितले की, जेट एअरवेजच्या प्रशासनाचा निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असून पाच विमानांसह त्यांची देशांतर्गत सेवा अद्याप सुरू आहे. ‘जेट’ने आंतरराष्ट्रीय उड्डाणे १८ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.जेट एअरवेजचे संस्थापक व माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातून जेटसाठी बोली लावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला विरोध झाल्यानंतर त्यांनी प्रक्रियेमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी बँकांनी जेटला वाचविण्यासाठी ४०० कोटी देण्याची मागणी केली.