‘जेट’ घेणार पुन्हा भरारी; लवादाकडून ‘कालराॅक-जालान’ समूहाच्या प्रस्तावास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 10:31 AM2021-06-23T10:31:54+5:302021-06-23T10:35:01+5:30
ब्रिटनची कालराॅक कॅपिटल आणि युएई येथील उद्याेगपती मुरारीलाल जालान यांनी एकत्र येऊन कर्ज बाजारी झालेल्या जेट एअरवेजचा गेल्या वर्षी ताबा घेतला हाेता.
मुंबई : बंद पडलेल्या जेट एअरवेजची विमाने उड्डाण घेण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहेत. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने ‘कालराॅक-जालान’ समूहाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. लवादाने आता ‘डीजीसीए’ला ‘जेट’च्या विमानांसाठी स्लाॅट्स उपलब्ध करून देण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली आहे.
ब्रिटनची कालराॅक कॅपिटल आणि युएई येथील उद्याेगपती मुरारीलाल जालान यांनी एकत्र येऊन कर्ज बाजारी झालेल्या जेट एअरवेजचा गेल्या वर्षी ताबा घेतला हाेता. गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये जेट एअरवेजसाठी बाेली लावण्यात आली हाेती. या समूहाने बॅंका, वित्तीय संस्थांच्या कर्जाची परतफेड तसेच कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन असे एकूण १२०० काेटी रुपये पुढील पाच वर्षांमध्ये देण्याचा प्रस्ताव दिला हाेता. तसेच ३० विमानांसह विमानसेवा सुरू करण्याची याेजनादेखील सादर केली हाेती. लवादाने ते स्वीकारले आहेत. त्यामुळे आता चेंडू ‘डीजीसीए’कडे गेला.
जुन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा घेण्याचा विचार
सुरुवातीला ३० विमानांसह उड्डाणे सुरू करण्यात येतील. त्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत १२५ विमानांचा ताफा उड्डाण घेईल, असे समूहाचे प्रमुख मुरारीलाल जालान यांनी सांगितले. जुने वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांनाही पुन्हा कामावर घेण्याचाही कंपनीचा विचार असून त्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्लाॅट्सकडे लक्ष
कर्जबाजारी आणि आर्थिक संकटामुळे जेट एअरवेजची विमाने एप्रिल २०१९ पासून जमिनीवरच हाेती. त्यांचे स्लाॅट्स इतर विमान कंपन्यांना देण्यात आले हाेते. पूर्वीच्या स्लाॅट्सवर ‘जेट’ दावा करू शकणार नाही. नियमांनुसार स्लाॅट्स देण्यात येतील, असे ‘डीजीसीए’ने यापूर्वी स्पष्ट केले हाेते. त्यामुळे काेणते स्लाॅट्स ‘जेट’ला मिळतात, यावरही बऱ्याच गाेष्टी अवलंबून राहणार आहेत.