जहांगीर आर्ट गॅलरीत 'ज्यूवेल ऑफ माइन्स' प्रदर्शन, ज्येष्ठ चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृतींचे प्रदर्शन
By संजय घावरे | Published: May 27, 2024 08:30 PM2024-05-27T20:30:46+5:302024-05-27T20:31:03+5:30
Mumbai News: 'ज्यूवेल ऑफ माइन्स' या प्रदर्शनामध्ये मुंबईकरांना कला जगतातील प्रथितयश, सुविख्यात, ज्येष्ठ चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्यपूर्व ते समकालीन काळातील कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई - 'ज्यूवेल ऑफ माइन्स' या प्रदर्शनामध्ये मुंबईकरांनाकला जगतातील प्रथितयश, सुविख्यात, ज्येष्ठ चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्यपूर्व ते समकालीन काळातील कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने कला संग्राहक आणि रसिकांना काळाच्या विस्तीर्ण पटलावरील कलाकृतींचा आस्वाद घेता येईल.
काळा घोडा येथील जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये 'ज्यूवेल ऑफ माइन्स' हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. रबि आर्ट गॅलरी, शांतिनिकेतन पश्चिम बंगाल यांच्यामार्फत २८ मे ते ३ जून २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात रामकिंकर बैज, प्रकाश कर्माकर, अबनींद्रनाथ टागोर, के.जी. सुब्रमण्यन, गगनेंद्रनाथ टागोर, सुहास रॉय, नंदलाल बोस, लालू प्रसाद शॉ, बिनोद बिहारी मुखर्जी, के. लक्ष्मा गौड, चित्तोप्रसाद भट्टाचार्य, जोगेन चौधरी, सोमनाथ होरे, समीर आयच, गणेश पाईन, सुब्रता गंगोपाध्याय, राबिन मंडल, सुनिल पडवळ, पारितोष सेन, रबि पाल, निरोडे मजुमदार, टी. वैकुंटम, सुनिल दास, टी. व्ही. संतोष आदी ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृती पाहायला मिळतील. मॉडर्न आर्ट हे कला संग्रहांकांच्या यादीत नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे, पण दुर्मिळ आणि अस्सल कलाकृती मिळवणे कायमच अवघड ठरते. त्यामुळे हे प्रदर्शन कला संग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे आयोजन काकली पाल यांनी केले आहे. या प्रदर्शनात कला रसिक दोन शतकातील भारतीय कला, त्यातील प्रवाह, नवीन शैलींची सुरुवात या सगळ्यांचा अनुभव घेऊ शकतील. बंगाल स्कूलच्या वॉटरकलर, टेम्पेरा, ग्वॉश अशा विविध माध्यमांतील कलाकृतींचा आस्वाद घेता येईल. भारतीय संस्कृती, अध्यात्मिकता, परंपरा या भारतीय चित्रकारांसाठी कायमच प्रेरणास्रोत ठरल्या आहेत. हे प्रदर्शन कला रसिकांना समृद्ध भारतीय कला शैलीची सफर घडवून आणेल.
काकली अत्यंत काटेकोरपणे मागील ३० वर्षात जमवलेल्या दुर्मिळ कलाकृतींचा संग्रह रसिकांसमोर सादर केला आहे. काकली यांचे वडील रबि पाल यांच्या स्मृतीनिमित्त सुमंत पाल यांनी रबि आर्ट गॅलरीची स्थापना केली. रबि पाल हे रामकिंकर बैज आणि नंदलाल बोस यांचे शिष्य होते. त्यांनी सत्यजित राय यांच्यासोबत काम केले आहे. एक दुरदृष्टी असलेले कलासंग्राहक आणि संयोजक सुमंत पाल यांनी अनेक यशस्वी कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुमंत यांनी अनेक कलाकारांसोबत काम करून स्वतःचा कला संग्रह तयार केला आहे.