मुंबई
शेठला मुलगा झाल्याचे सांगत मिळणाऱ्या साडीसाठी वृद्धेला ६८ हजार रुपयांचे दागिने गमवावे लागल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपर परिसरात राहत असलेल्या ६० वर्षीय तक्रारदार खोत गल्लीत पूजेचे साहित्य घेण्याकरिता गेल्या होत्या. त्या दरम्यान, एका अनोळखी तरुणाने त्यांना थांबविले. दरम्यान, शेठ आवाज देत असल्याचे सांगत शेठला बऱ्याच वर्षांनी मुलगा झाल्याने तो गरीब महिलांना साडी आणि पैसे वाटप करणार असल्याचे सांगितले. फुकटची साडी आणि पैसे मिळणार असल्याने वृद्ध महिला विश्वास ठेवत तरुणाच्या मागे गेल्या.
पुढे एका दुकानाकडे त्यांना थांबवून तेथे आलेल्या दुसऱ्या साथीदाराने हातात १०० रुपयांची नोट दिली. तसेच शेठ येईपर्यंत गळ्यातील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून दागिने काढून हातात दिले. रुमालात दागिने काढून देत, शेठला घेऊन येतो सांगत ठग निघून गेला. बराच वेळ उलटूनही तरुण न परतल्याने त्यांना संशय आला. त्यांनी रुमालातील दागिने तपासले असता त्यात दागिन्याऐवजी दगड मिळून आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धेने पोलिसात धाव घेत घाटकोपर पोलिसात गुन्हा दाखल केला.