Join us

चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 5:38 AM

जळालेल्या घरातील कपाटातून सुमारे दहा ते १२ तोळे सोन्याचे दागिने आणि साडेचार लाख रुपये चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चेंबूर सिद्धार्थ कॉलनीतील आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून बचावलेले बाप-लेक सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच घरातील १० ते १२  तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे साडेचार लाखांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांना आढळले. त्यांनी त्याबद्दल पोलिसांत तक्रार केली आहे.   

या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले छेदिराम गुप्ता (७०) यांची मुलगी वनिता यांनी सोमवारी चेंबूरपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जळालेल्या घरातील कपाटातून सुमारे दहा ते १२ तोळे सोन्याचे दागिने आणि साडेचार लाख रुपये चोरीला गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

मृतांवर अंत्यसंस्कार

गुप्ता कुटुंबातील सात जणांच्या मृतदेहांवर रविवारी रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही सिद्धार्थ कॉलनी परिसरात स्मशानशांतता होती. सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

तिजोरी उघडली कोणी?     

सात मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डची गरज होती. त्यासाठी रविवारी संध्याकाळी वनिता घरी गेल्या तेव्हा पहिल्या माळ्यावरील कपाटातील तिजोरीचा दरवाजा उघडाच होता. त्यात दागिने, रोख रक्कम नव्हती. आग दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान, पालिका कर्मचारी आणि काही तरुणांचा वावर तेथे होता, असेही वनिता यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, चेंबूर पोलिस तपास करत आहेत.

 

टॅग्स :चेंबूरआगपोलिस