ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - झोपडपट्टी पुनर्विकास भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई उपनगराचे माजी जिल्हाधिकारी विश्वास पाटील यांच्या विरोधात सत्र न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या आधीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर फायलींवर सह्या केल्या आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. विशेष म्हणजे विश्वास पाटलांच्या कार्यतत्परतेची दखल विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनीही घेतली होती. विश्वास पाटील यांच्या निवृत्तीच्या अखेरच्या महिन्यातील फायलींची फेरतपासणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या एका समितीचीही स्थापना करण्यात आली असून, ही समिती 15 दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. विश्वास पाटलांच्या कार्यतत्परतेची दखल मीडियानं घेतल्यानंतर पाटील यांनी स्वाक्ष-या केलेल्या फायलींची फेरतपासणी करण्यास नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मिलिंद म्हैसकर यांच्याकडे हा कार्यभार होता. मात्र त्यानंतर प्रधान सचिव दीपक कपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वर्णी लावली आहे. कपूर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पाटील यांनी सह्या केलेल्या सर्व फायली तपासणीसाठी ताब्यात घेतल्या. या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीशांसह झोपु प्राधिकरणातील नगररचनाकार, वास्तू रचनाकार आणि विधी विभागातील अधिका-यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही समिती मुख्य कार्यकारी अधिकारी कपूर यांनीच तयार केली आहे. या समितीकडे पाटील यांनी निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात सह्या केलेल्या फायली सोपविण्यात येणार आहेत. पाटील यांच्या निवृत्तीच्या अखेरच्या महिन्यातील म्हणजे जूनमधील फायलींची फेरतपासणी होणार असून, त्याचा अहवाल सरकारला सुपूर्द केला जाणार आहे, असं झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर म्हणाले आहेत. या समितीला 15 दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले होते. तर गेल्या काही दिवसांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील अनेक घोटाळे उघड होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून सर्वाधिकारी हे फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामुळेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादीनं केला होता. विश्वास पाटलांवर काय आहेत आरोप ?ताडदेवमधल्या एम. पी. मिल कंपाऊंडमधल्या एस. डी. कॉर्पोरेशनला झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील नियमांचं उल्लंघन करत चटईक्षेत्र वाढवून भूखंड दिल्याचा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावर आरोप आहे. गृहनिर्माण मंत्र्यांनी फायली मंजुरीनंतर प्रशासकीय अधिकारी म्हणून विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होतंय की नाही, याची तपासणी का करण्यात आली नाही, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ताडदेवमधील अतिरिक्त चटईक्षेत्र घोटाळ्यात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा हात असल्याचा आरोप होतोय. घाटकोपरमधील एका योजनेसाठी लाचेची रक्कमच पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली. यावेळी मेहता आणि भाजपच्या एका आमदाराचेच नाव घेण्यात आले. यावरून मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या झोपटपट्टी पुनर्विकास योजनेत गौडबंगाल आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता.
झोपडपट्टी पुनर्विकास भ्रष्टाचार प्रकरणात विश्वास पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 4:10 PM