Join us

मध्य रेल्वेच्या तीन प्रकल्पांसाठी ‘जोर’बैठका

By admin | Published: September 22, 2014 1:32 AM

मध्य रेल्वेकडून सध्या तीन प्रकल्पांवर जोर देण्यात येत असून, या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत

मुंबई : मध्य रेल्वेकडून सध्या तीन प्रकल्पांवर जोर देण्यात येत असून, या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. या प्रकल्पात सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, वडाळा ते कुर्ला नवीन मार्ग आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा समावेश आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांची कामे २0१४ च्या अखेरीस पूर्ण केली जाणार होती. मात्र निधीच उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे रखडली होती. यात सीएसटी ते कुर्ला या पाचव्या-सहाव्या मार्गाचा समावेश होता. एकूण ९00 कोटी रुपये किंमत असलेल्या या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने प्रकल्पाचे कामच सुरू झाले नव्हते. या कामाच्या खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पडून होता. अखेर पाचव्या-सहाव्या मार्गाच्या या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातच परेल टर्मिनसच्या खर्चाचा समावेश आहे.या तीनही प्रकल्पांचा मध्य रेल्वेकडून बैठकांमधून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. यासाठी पश्चिम रेल्वे, महानगरपालिका, सिडको आणि अन्य विभागांनाही बोलावण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या काही वर्षांत हे प्रकल्प मार्गी लागावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.