जाहला विटेवरी... दंग पांडुरंग...!

By admin | Published: July 4, 2017 06:25 AM2017-07-04T06:25:30+5:302017-07-04T06:25:30+5:30

सावळ्या कायेवर एकरूप झालेल्या हिरव्याकंच तुळशीमाळांनी ‘त्याचे’ रूप अधिकच खुलले खरे; परंतु हा ओघ थोपवायचा कसा हे मात्र

Jhela Vitrevi ... Dang Pandurang ...! | जाहला विटेवरी... दंग पांडुरंग...!

जाहला विटेवरी... दंग पांडुरंग...!

Next

राज चिंचणकर / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सावळ्या कायेवर एकरूप झालेल्या हिरव्याकंच तुळशीमाळांनी ‘त्याचे’ रूप अधिकच खुलले खरे; परंतु हा ओघ थोपवायचा कसा हे मात्र त्याला समजेना. कटीवरचे हात बाजूला घेऊन चालण्यासारखे नसल्याने तो तसाच निश्चल उभा राहिला. एकादशीच्या काकड आरतीपासूनच तो तुळशीमाळांमध्ये वेढला गेला. पण त्याच्या अगदी मुखापर्यंत माळा पोहोचल्याचे लक्षात येताच, हा भार अलगद त्याच्या गळ्यातून काढला जात होता. तेवढीच त्याला उसंत मिळायची आणि या अवधीत एखादा दीर्घ श्वास घेण्यासाठी त्याला सवडही मिळायची. पण पुन्हा तुळशीमाळांमध्ये बुडून जाण्यासाठी तो सज्ज व्हायचा. काय करणार... भक्तांचे प्रेम त्याला आज प्रदीर्घ पेलायचे होते आणि तसे न करून सांगतो कुणाला? वर्षातून एकदाच तर येते आषाढी...!
या सगळ्या यातायातीत त्याने भक्तांवरची नजर हलकेच हटवून सहज डावीकडे पाहिले आणि ‘तिच्या’ डोळ्यांतील ते ‘सुंदर ध्यान’ पाहून त्याला धन्य वाटले. काळ्या देहावर सृष्टीने पांघरलेला हिरवा शेलाच की जणू...! ते गोजिरे रूप पाहून तो अपार सुखावला. त्याचक्षणी उराउरी भेटू पाहणाऱ्या भक्तांच्या मायेची ऊब त्याला जाणवली आणि मग विनातक्रार तो तुळशीमाळांना सामोरा जाऊ लागला. गाभाऱ्यात आता लगबग वाढली होती. मुखी त्याचे गुणगान करत छोट्यांपासून हाती काठी धरलेले माउलीगण त्याला आळवत होते. सर्वत्र ‘विठ्ठल अवघा विठ्ठल’ सामावून राहिला होता. दिंड्या नाचू लागल्या, कीर्तनाला रंग चढला. राऊळी येऊन पोहोचलेल्या पालख्यांमध्ये त्याची अनेक रूपे त्याला दिसत होती. मुखी विठ्ठलनाम, हाती चिपळ्या आणि डोईवर तुळस घेऊन बायाबापडे भक्तीत समरस झाले होते.
आषाढीच्या या गर्दीत धोतर, पागोटे, सदरा, लुगडे अशा वस्त्रांच्या संगतीतच अनाहूतपणे ‘खादी’चे दर्शनही त्याला झाले. शिष्टाचार म्हणून ते तसे होणार होतेच; मात्र सात्त्विक भक्तिभावात दंग झाल्याने तो ते विसरला होता. पंचक्रोशीतील होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या तुळशींची पाने खुडून आणलेला भलामोठा तुळशीहार एकदाचा त्याच्या गळ्यात विसावला आणि पुढच्याच क्षणी त्याला समोरचे काही दिसेनासे झाले. याच गडबडीत राऊळात आरती, नैवेद्य, प्रसाद सर्व काही यथासांग पार पडले.

आषाढीच्या अंतिम चरणाला प्रारंभ

उन्हे कलली आणि आषाढी मावळतीकडे झुकू लागली. जनांचा प्रवाहो मात्र नंदादीपाच्या उजेडात अधिकच वाढत होता. हरिनामाचे स्वर टिपेला पोहोचले. जिव्हाळा, प्रेम, दया, करुणा व भक्तीने गाभारा भरून गेला. हे सर्व पाहून त्याचे मनही काठोकाठ व्यापून गेले. आषाढीच्या अंतिम चरणाला प्रारंभ झाला.
गाभाऱ्याची द्वारे बंद होण्याचा समय समीप येऊन ठेपला. त्याने रखुमाईकडे दृष्टी वळवली. आषाढीचा अवघा सोहळा तिच्या डोळ्यांत रंगला होता. त्याने स्वत:च्या गळ्यातली तुळशीमाळ काढून हलकेच तिच्या गळ्यात घातली. तिच्या डोळ्यांत चंद्रभागा तरळली आणि मग त्यात ते ‘सुंदर ध्यान’ हळुवारपणे अंतर्धान पावू लागले...!

Web Title: Jhela Vitrevi ... Dang Pandurang ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.