मुंबई : अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोली याच्यावर आरोप निश्चित करण्यासंदर्भात युक्तिवाद करण्यास सीबीआयच्या वकिलांकडून विलंब होत असल्याने, विशेष न्यायालयाने वकिलांनाच धारेवर धरले. सोमवारी विशेष न्यायालयाच्या न्या. अंजू शेंडे यांनी सीबीआयचे वकील दिनेश तिवारी यांना, सूरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्याबाबत युक्तिवाद करण्यास सांगितले. त्यावर अॅड. तिवारी यांनी सीबीआयने आवश्यक असलेली कागदपत्रे न दिल्याचे सांगत, युक्तिवाद करण्यास असमर्थता व्यक्त केली. ‘तुम्ही (अॅड. तिवारी) नेहमीच येऊन तक्रार करता, याचे मला आश्चर्य वाटते. सरकारी वकिलांना आरोपपत्रावर अवलंबून राहायचे नाही, त्यांना कागदपत्रे हवी आहे, असे वाटते, पण न्यायालय आरोपपत्रांच्याच आधारे आरोप निश्चित करणार आहे. तुमच्याकडे आरोपपत्र असताना, अन्य कागदपत्रांची आवश्यकता काय? आरोपत्राच्या आधारे तुम्ही युक्तिवाद करू शकता,’ असे म्हणत न्या. शेंडे यांनी सरकारी वकिलांना धारेवर धरले.तपास यंत्रणेच्या उदासीनतेमुळे खटल्यास विलंब होत आहे,’ असे म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला. याबाबतची सुनावणी २५ फेब्रुवारी रोजीपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)
‘जिया खान प्रकरणी होतोय विलंब’
By admin | Published: February 23, 2016 2:52 AM