Join us

जिया खान आत्महत्याप्रकरणाचा खटला चालवू नका - हायकोर्ट

By admin | Published: June 20, 2017 2:44 AM

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या अर्जावर निर्णय घेण्यात येत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा खटला चालवू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला सोमवारी दिले.या प्रकरणात दोन तपास यंत्रणा (पोलीस आणि सीबीआय) सहभागी आहेत. सीबीआयने कारवाई केलेल्या केसमध्ये राज्य सरकारला विशेष सरकारी वकील नेमण्याची मुभा आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे, असे न्या. ए. के. मेनन यांनी म्हटले. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती झाल्यानंतर सत्र न्यायालयाने सीबीआयला अर्ज करण्याची किंवा साधा युक्तिवाद करण्याचीही परवानगी दिली नाही, असे सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. राबिया खान यांनी यापूर्वी सीबीआयविरुद्ध खटला लढवण्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलाचीच सरकारने खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली.सरकार सीबीआयवर विशेष सरकारी वकील लादू शकते का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. पुढील सुनावणीत महाअधिवक्त्यांनी उपस्थित राहावे. तोपर्यंत सत्र न्यायालयाने या खटला चालवू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले.