मुंबई : अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला अभिनेता सूरज पांचोलीवरील खटल्यास सुरुवात करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला गुरुवारी दिले. जिया खानने २०१३ मध्ये तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अॅड. दिनेश तिवारी यांची या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, यासाठी जियाची आई राबिया खान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे होती.जिया खानने आत्महत्या केली, या सीबीआयच्या निष्कर्षाशी मी सहमत नसल्याने सीबीआयच्याच वकिलाने केस लढावी, अशी माझी इच्छा नाही, असे राबिया यांनी याचिकेत म्हटले आहे. राबिया यांच्या म्हणण्यानुसार, सूरज पांचोलीने जिया खानची हत्या केली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणी ११ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. मात्र खटल्यास स्थगिती देण्यास नकार दिला.जियाने ३ जून २०१३ रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर तिचा प्रियकर आणि बॉलीवूड अभिनेता सूरज पांचोलीला तिला आत्यहत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल अटक केली.
‘जिया खानचा खटला सुरू करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 5:05 AM