Join us

जिया खान आत्महत्या :राबिया खान यांना दिलासा नाही

By admin | Published: February 10, 2017 4:54 AM

जिया खान आत्महत्याप्रकरणाचा सीबीआयने सर्व अंगाने तपास केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी नवीन पुरावे सादर केले नाहीत

मुंबई : जिया खान आत्महत्याप्रकरणाचा सीबीआयने सर्व अंगाने तपास केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी नवीन पुरावे सादर केले नाहीत, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने राबिया खान यांची सीबीआयच्या दोषारोपपत्राला आव्हान देणारी याचिका फेटाळली. जिया खानची हत्या करण्यात आली नसून, तिने आत्महत्या केल्याचे सीबीआयने दोषारोपपत्रात नमूद करत, अभिनेता सूरज पांचोलीला तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे. राबिया यांच्या म्हणण्यानुसार, जिया खानने आत्महत्या केली नसून, सूरज पांचोलीने तिची हत्या केली आहे. मात्र, तिच्या या आरोपाचे समर्थन सीबीआयकडून न करण्यात आल्याने, राबिया यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात यावी व उच्च न्यायालयाचे देखरेखीखाली तपास करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. सीबीआयने या प्रकरणाचा तपास नीट केला नसून, अनेक महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सीबीआयचा तपास समाधानकारक नाही, असे राबिया यांनी याचिकेत म्हटले आहे.‘घटनेच्या तीन वर्षांनंतर पुढील तपास करण्याचे निर्देश देऊन किंवा एसआयटी नियुक्त करून काहीही साध्य होणार नाही. तज्ज्ञांच्या मतावरून पोलीसच नाहीत, तर सीबीआयनेही हत्येच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास केला. मात्र, दोन्ही तपासयंत्रणांनी ही हत्या नसून, आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला आहे,’ असे म्हणत खंडपीठाने राबिया खानची याचिका निकाली काढली.उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सूरज पांचोलीवर खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सूरज पांचोलीनेही खटल्याला दिलेली स्थगिती हटवण्यासाठी राबिया खानच्या याचिकेत मध्यस्थी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्याचाही अर्ज फेटाळला. जिया खानने ३ जून २०१३ रोजी तिच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. तिला आत्महत्या करण्यास तिचा प्रियकर व अभिनेता सूरज पांचोलीने प्रवृत्त केल्याचा आरोप सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. राबिया खानने एसआयटी नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)