मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.
भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यात शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद सहभागी झाले होते. आजचा विलेपार्ल्यातील कार्यक्रम आयोजित करण्यावर छात्रभारती संघटना ठाम असून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली आहे. त्यामुळे विलेपार्ल्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनात जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद सहभागी होणार आहेत. तिथे दोघांची भाषणे होणार आहेत.
रस्त्यावरची लढाई ‘नवी पेशवाई’ संपवेल!देशात जातीअंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल. त्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा, पक्षाचा, विचारधारेचा, गटा-तटाचा विचार न करता एकत्रित येवून लढा उभारला तर २०१९ मधील महासंग्रामात नरेंद्र मोदी यांना घरी बसवू, असा इशारा गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी एल्गाप परिषदेत बोलताना दिला. एल्गार परिषदेत सहभागी होऊ नये, अशी भीती काही संघटनांकडून घातली जात होती. पण, मी तुमच्या मोदी व शहांना घाबरलो नाही. तुम्ही तर अजून बच्चे आहात. ५६ इंची छाती फाडून येथे आलो आहे.
कोण आहे जिग्नेश मेवाणी जिग्नेश मेवाणी हा गुजरातमध्ये उदयाला आलेला दलित राजकारणाचा चेहरा आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. सामाजिक कार्यकर्ते आणि पेशाने वकिल असणारे जिग्नेश मेवाणी यांनी गुजरातमध्ये दलितांच्या न्याय-हक्कासाठी लढा दिला आहे.