Join us

हाफिज सईदच्या इशा-यावरूनच केला 'जिहाद' - हेडली

By admin | Published: February 08, 2016 8:25 AM

हाफीज सईदमुळे प्रभावित होऊन मी 'लष्कर'मध्ये सहभागी झालो आणि 'जिहाद' केला अशी कबुली डेव्हिड हेडलीने दिली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - 'लष्कर-ए-तोयबाचा' म्होरक्या ' हाफिज सईद' याच्यामुळे प्रभावित झाल्यानेच आपण 'लष्कर'मध्ये सहभागी झालो आणि त्याच्या आदेशानुसारच 'जिहाद' केला अशी कबुली मुंबईत २६/ ११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सहभागी आरोपी डेव्हिड हेडलीने दिली. ' इस्लामच्या शत्रूंविरोधात लढा देणे म्हणजेच जिहाद' अशी व्याख्याही त्याने स्पष्ट केली.
 मुंबई हल्ल्यात हात असल्याप्रकरणी अमेरिकेतील तुरुंगात ३५ वर्षांची शिक्षा भोगणा-या हेडलीला सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्याने या हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाबाबत महत्वपूर्ण खुलासे केले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीसाठी उपस्थित होते. 
भारतात घुसता यावे म्हणून आपण अमेरिकी नावाने बनावट पासपोर्ट बनवला व ८ वेळा भारतात येऊन गेलो, असे सांगतानाच पाकिस्तानमध्येच दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण मिळाल्याची महत्वपूर्ण कबुली डेव्हिड हेडलीने दिली. तसेच लष्कर-ए-तोयबाच्या साजिद मीरनेच आपल्याला पासपोर्ट मिळवून दिल्याचेही त्याने कबूल केले. २६/११ पूर्वीही मुंबईवर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र ते दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे त्याने नमूद केले. 
" कुख्यात दहशतवादी संघटना ' लष्कर-ए-तोयबाशी' मी इमान राखून होतो, मी त्यांचा कट्टर समर्थक होतो. 'लष्कर'चा दहशतवादी साजिद मीर याच्या सहाय्याने मी खोटा पासपोर्ट बनवला. अमेरिकी नावाने मला भारतात प्रवेश करायचा होता, म्हणून मी नाव बदललं.  माझं जन्मठिकाण, जन्मदिनांक, माझ्या आईचे राष्ट्रीयत्व आणि पोसपोर्ट नंबर याव्यतिरिक्त पासपोर्टवरील इतर सर्व गोष्टी खोट्या होत्या," असे हेडलीने त्याच्या साक्षीदरम्यान नमूद केले. " मला नवा पासपोर्ट मिळाल्यानंतर मी एकूण ८ वेळा भारतात आलो. त्यापैकी ७ वेळा पाकिस्तान आणि एकदा युएईमधून मी भारतात आलो. सात वेळा मी मुंबई मुक्काम केला. मुंबईत जाऊन मी एखादा व्यवसाय व ऑफीस सुरू करावा तसेच मुंबई शहराची रेकी करून व्हिडीओ शूटिंग करावे असे साजीद मीरने मला सांगितले होते", असेही हेडलीने सांगितले. मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर आपण पुन्हा ७ मार्च २००९ रोजी लाहोरहून भारतात येऊन गेल्याचेही त्याने नमूद केले.
२६/११ च्या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला सय्यद झबिउद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल याच्यावर सध्या सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. त्याच्याबरोबर डेव्हिड हेडलीलाही न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात यावे, अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली होती.  २६/११ च्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कटामागील पितळ उघडे पाडण्यात तसेच कटासंबंधीच्या अनेक गोष्टी उघड होण्यात हेडलीची साक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे.
२६/११च्या हल्ल्यात हात असल्याने अमेरिकेच्या न्यायालयाने हेडलीला ३५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांनी बुधवारी अमेरिकेच्या संबंधित प्रशासनाला समन्स बजावत त्याला न्यायालयात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याचा आदेश दिला होता. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात १६६ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर ३०० हून अधिक नागिरक जखमी झाले.
 
 डेव्हिड हेडलीच्या साक्षीतील महत्वपूर्ण मुद्दे :
- मला दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण पाकिस्तानमध्येच मिळालं.
- मी लष्कर-ए-तोयबाशी इमान राखून होतो, त्यांचा खरा समर्थक होतो. माझं नाव बदलल्यानंतर काही आठवड्यांनी मी पाकिस्तानला भेट दिली.
- अमेरिकी नावाने मला भारतात प्रवेश करायचा होता, म्हणून मी नाव बदललं. त्यानंतर मी पाकिस्तानात जाऊन लष्कर-ए-तोयबाच्या साजिद मीरला भेटलो, त्यानेच मला पासपोर्ट मिळवून दिला. मी भारतात जाऊन एखादा व्यवसाय सुरू करावा असं त्याचं म्हणणं होतं.
- मला नवा पासपोर्ट मिळाल्यानंतर मी एकूण ८ वेळा भारतात आलो. ७ वेळा पाकिस्तान आणि एकदा युएईमधून. मी ७ वेळा मुंबईत राहिलो. साजिद मीरने मला मुंबई शहराची रेकी करून शहराचे व्हिडीओ शूटिंग करण्यास सांगितले होते.
- मुंबई हल्ल्यानंतरही मी ७ मार्च २००९ मध्ये लाहोरहून भारतात येऊन गेलो
- जन्मठिकाण, जन्मदिनांक, माझ्या आईचे राष्ट्रीयत्व आणि पोसपोर्ट नंबर याव्यतिरिक्त माझ्या पासपोर्टवरील इतर सर्व गोष्टी खोट्या होत्या.
- २६/११ पूर्वी मुंबईवर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पहिल्यांदा सप्टेंबर २००८ मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यावेळी दहशतवाद्यांची बोट समुद्रात खडकावर आपटल्याने शस्त्रास्त्रे व स्फोटके नष्ट झाली. 
- त्यानंतर ऑक्टोबर २००८ मध्ये दुस-यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही अयशस्वी ठरला. मात्र तिसरा व अखेरचा (२६ नोव्हेंबर २००८) हल्ला यशस्वी ठरला 
-  मी परदेशी नागरिकासारखा दिसत असल्यामुळे मला व निवृत्त मेजर अब्दुर रेहमान पाशा यांना पाकिस्तान- अफगाण सीमेजवळ अटक करण्यात आली.
-  मी अटकेत असताना मेजर अली हे माझी चौकशी करण्यासाठी आले. तेव्हा माझ्याकडे काही भारतीय साहित्य, पुस्तके होती. भारतात माझा व्यवसाय असल्याचे मी मेजर अली यांना सांगितले. भारतातील गुप्त माहिती मिळवण्यासाठी मी उपयोगी ठरू शकेन असे अली यांना वाटले.
- पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या मेजर इक्बाल यांच्याशी मेजर अलीने माझी ओळख करून दिली - डेव्हिड हेडली
- लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या भाषणाने प्रभावित होऊनच मी २००२ साली लष्करमध्ये सहभागी झालो
- हाफिज सईदच्या आदेशांवरूनच मी 'लष्कर'ची कामे केली.
- ' दौरा-ए-सुफ्फा', ' दौरा-ए-खासा', ' दौरा-ए-रिबत' यासारख्या ५-६ ठिकाणी मला दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाले. तिथेच माझी भेट 'झकी-उर-रेहमान-लख्वी' आणि ' हाफीज सईद' यांच्याशी झाली. 'भारत हा इस्लामचा शत्रू आहे' हेही त्या कॅम्प्समध्ये आम्हाला शिकवण्यात आले. 
- भारतीय लष्कराविरोधात लढण्यासाठी मी काश्मीरला जाण्याचा निर्धार केला होता, मात्र त्यांनी (झाकी उर रेहमान लख्वी) मला जाऊ दिले नाही.
- मुंबई २६/११ हल्ला: 'इस्लाम'च्या शत्रूंविरोधात लढणे म्हणजेच 'जिहाद'- डेव्हिड हेडलीने स्पष्ट केली 'जिहाद'ची व्याख्या.