मुंबई : राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मते मागणाऱ्या भारतीय जनता पार्टीला, राजमाता जिजाऊंच्या जयंतीचा विसर पडल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर मुंबईत रंगली होती. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ््याला गुरुवारी अर्धा दिवस उलटला, तरी एकही भाजपा नेता फिरकला नसल्याचा आरोपही काही संघटना आणि पक्षांनी केला. मात्र, टीकेची झोड उठल्यानंतर, या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा भाजपा नेत्यांनी केला आहे.जिजाऊ जयंतीनिमित्त निर्वाण एज्युकेशनल अँड चॅरिटेबल संस्थेने महिला बचत गटाची स्थापना केली. महिलांना सक्षम करण्यासाठी या बचत गटाची स्थापना करून जिजाऊंना अभिवादन केल्याचे संस्थेचे जयेश रणदिवे यांनी सांगितले. या वेळी संविधानाचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दरम्यान, महापौर स्नेहल आंबेकर यांनीही जिजाऊंच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या वेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या मुंबई विभागानेही मराठमोळ््या पेहरावात उपस्थिती दर्शवत जिजाऊंना अभिवादन केले. मात्र, भाजपाचे कोणतेही पदाधिकारी किंवा नेते या ठिकाणी आले नसल्याची चर्चा या कार्यक्रमांत होती.केवळ सत्ता मिळवण्यासाठी भाजपा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप, शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी केला. ते म्हणाले की, ‘भाजपाला केवळ सत्ता दिसत असून, शिवाजी महाराज किंवा मराठी अस्मितेशी काही देणे नाही. त्यामुळेच जिजाऊंच्या जयंतीचा त्यांना विसर पडला आहे. एवढेच नाही, तर भाजपाच्या बॅनरवर शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला जागा नाही. त्यामुळे त्यांची खोटी अस्मिता उघडी पडली आहे.’या संदर्भात भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष राकेश जेजुरकर यांनी सांगितले की, ‘केवळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपावर हे आरोप होत आहेत. कोणतेही निमंत्रण नसताना भाजपाचे विधानसभा अध्यक्ष भाई दुखंडे यांनी सकाळीच जिजाऊंच्या पुतळ््याला अभिवादन केले. त्याचा फोटो त्यांनी काढला की नाही, याबाबत माहिती नाही. याशिवाय दुपारी आपण स्वत: कार्यकर्त्यांसोबत जिजाऊंना नमन करून आलो. भाजपाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या बॅनरवर छत्रपतींचे छायाचित्र असते.’ (प्रतिनिधी)
जिजाऊंच्या जयंतीचा भाजपाला विसर
By admin | Published: January 13, 2017 7:06 AM