Join us

'त्या' कंडक्टर ताईसाठी जितेंद्र आव्हाड सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 7:27 AM

कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील वैयक्तिक वॉलवर विविध रिल्स अपलोड केलेले असतात

मुंबई/ उस्मानाबाद : 'तुमच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हानिकारक वाटत आहे,' असे नमूद करत कळंब आगारातील दोन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यात एका महिला वाहकाचा तर एका वाहतूक नियंत्रकाचा समावेश आहे. मात्र, या महिला वाहकाच्या निलंबनाची बातमी समाज माध्यमांवर व्हायरल होताच, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दखल घेत ते महिला वाहकाच्या बाजुने उभे राहिल्याचे दिसून येते. आव्हाड यांनी त्या महिलेला पुन्हा कामावर रुजू करुन घ्यावे, अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.

कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील वैयक्तिक वॉलवर विविध रिल्स अपलोड केलेले असतात. दरम्यान, त्यांच्या. यातील काही पोस्टचा विचार करून, आगारप्रमुखांनी आगारातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यासंबंधी आगाराच्या नोटीस बोडांवर निलंबनादेश अडकविण्यात आले आहेत. कंडक्टर मंगल सागर गिरी आणि वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार अशी निलंबित कर्मचाऱ्यांचे नाव आहे. यात 'तुमच्यावर ठेवलेल्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेता, तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हानिकारक ठरत आहे,' असा ठपका ठेवत, शनिवारपासून निलंबित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर संबंधित महिलेच्या निलंबनाची बातमी व्हायरल झाली. त्यामुळे, अनेकांनी या महिलेवरील निलंबनाच्या कारवाईला विरोध केला. तसेच, सोशल मीडियातून तिचे समर्थनही केले आहे. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन हा वर्गसंघर्ष आहे, या महिलेला पुन्हा कामावर घ्या, अशी मागणी केली आहे.   राज्य परिवहनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कंडक्टरने समाजमाध्यमांचा आधार घेत स्वतःचा एक व्हिडीओ अपलोड केला. पण अत्यंत तातडीने राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांनी तीला कामावरून निलंबित केले. तीचा गुन्हा काय होता, हे मात्र कळायला मार्ग नाही. अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी (महिला व पुरुष) त्ते संपूर्ण देशातून फेसबुक, ट्वीटर व इतर समाजमाध्यमांचा उपयोग करून स्वतः प्रसिद्धीच्या वर्तुळात राहत असतात. मग, ह्या बस कंडक्टरने काय गुन्हा केला. दुसरं काही नाही हा वर्ग संघर्षाचा लढा आहे. तिला कामा वर परत घ्या ,.. अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच, या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मेन्शन केलं आहे. त्यामुळे, आता या महिला कंडक्टरचे काय होते, ते पाहणे उत्सुकतेचं आहे.  

मला कुठलीही पूर्वसूचना दिली नाही

दरम्यान, आगारप्रमुखांकडून निलंबनाचे निश्चित कारण समजू शकले नसले, तरी निलंबित वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांनी मात्र या संदर्भात मला कोणतीही पूर्वसूचना न देता, बाजू मांडण्याची संधी न देता निलंबित केल्याचे सांगितले.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडबसचालकउस्मानाबादसोशल मीडिया