Join us

आव्हाड म्हणाले राहुल गांधींची हवा, महायुती जिंकेल फक्त एवढ्या जागा; दिल्लीचा संदर्भ दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 2:46 PM

राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला.

मुंबई - राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. २०१९ ते २०२४ या कालावधील महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारण अगदी ३६० डिग्रीमध्ये बदलून गेल्याचं देशाने पाहिलं. अनपेक्षितपणे महाविकास आघाडी जन्माला आली. त्यानंतर, शिवसेनेतील आश्चर्यकारक बंड पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. तर, अजित पवार यांनी दुसऱ्यांदा भाजपासोबत सत्तेत सहभागी होत अनेकांचे राजकीय अंदाज चूकवले. त्यामुळे, महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली आहे. म्हणूनच, महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. मात्र, भाजपप्रणित महायुतीला १५ ते १७ जागा मिळतील, असे भाकीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर, सध्या घोषित झालेल्या ५ राज्यांपैकी ४ राज्यात काँग्रेसचा विजय होईल, असेही त्यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर, आयोजित अनेक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येणार असल्याचं बोलून दाखवलं. तसेच, मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं आहे, असेही त्यांनी जाहीरपणे म्हटले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही २०२४ ला मोदीच येणार हे शिर्डीतील सभेतही सांगितले. त्यासाठी, भाजपसह मित्र पक्षांनी लोकसभेची रणनितीही आखायला सुरुवात केली आहे. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वेगळेच भाकीत केलं आहे. त्यांनी राज्यातील ट्रीपल इंजिन सरकारच्या महायुतीला १५ ते १७ जागांवरच विजय मिळेल, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी दिल्लीतील राजकीय सट्टा बाजाराचा संदर्भही दिली आहे. 

दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला. त्यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीला ३१ ते ३३ जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना १५ ते १७ जागा मिळतील, असे भाकीत आमदार आव्हाड यांनी केले आहे. तसेच, येणाऱ्या काळात या ५ राज्यातील निवडणूकींचा परीणाम हा संपूर्ण देशभरात दिसू लागेल आणि ह्या ५ राज्यांचा त्यांचा अंदाज असा आहे की, ५ पैकी कमीत-कमी ४ राज्ये काँग्रेस जिंकेल. राहुल गांधींची जोरदार हवा आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. 

दरम्यान, आव्हाड यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांना ट्रोल केलं जात आहे.

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडभाजपाराहुल गांधीनिवडणूक