मुंबई - राज्यात महापुरुषांसंदर्भातील वक्तव्याचा वाद काही केल्या संपुष्टात येताना दिसत नाही. राज्यपाल आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यानंतर विरोधी पक्षनेते अजित यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर नव्हता, असे विधान केले. त्यामुळे, यात आणखी भर पडली. आता शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून या सर्वच नेत्यांचा समाचा घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनाही लक्ष्य केलं असून सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर भाजपा गप्प का, असा सवालही शिवसेनेनं रोकठोक भूमिका मांडताना विचारला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर गप्प बसणारे छत्रपती संभाजीराजांच्या कथित अपमानावर अजित पवारांच्या विरोधात रान उठवत आहेत. औरंगजेब क्रूर नव्हता, असा साक्षात्कार राष्ट्रवादीच्या एका आमदारास याच वेळी झाला व औरंगजेबजी हे सन्माननीय आहेत, असे भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पटले. महाराष्ट्रातील धार्मिक गोंधळाचा हा नवा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचे प्रकरण आता मागे पडले असून भारतीय जनता पक्षाने वडिलांच्या अपमानावर उतारा म्हणून पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानाचे प्रकरण समोर आणले. शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनात बसून आहेत व संभाजीराजांच्या अपमानाबद्दल अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने सुरू केली. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाची ही दशा आहे!, असे म्हणत संजय राऊत यांनी रोखठोकमधून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्राचे पॉलिटीकल कपल
शिवाजी महाराजांच्या अपमानाचे प्रकरण सगळय़ात जास्त गंभीर असतानाही भाजपने त्यावर आवाज उठवला नाही याची इतिहासात नोंद राहील. दि. 4 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत आगमन झाले. राजभवनावर योगींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गेले. त्या भेटीदरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुहास्यवदनाने उभे असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांशी महाराष्ट्रातील 'पोलिटिकल कपल' अत्यंत सलगीने वागताना टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांवर जनतेने पाहिले. प्रेम आंधळे असते, पण यांना सत्तेने आंधळे केले व त्या अंधारात शिवरायांचा मान-सन्मान हरवला!
औरंगजेबाचे महात्म्य आव्हाड यांनी साांगितले
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाला नवे वळण देण्याचे काम याच दरम्यान केले. ''औरंगजेब क्रूर नव्हता,'' अशी नवीच माहिती आव्हाडांनी समोर आणली. औरंगजेबाचे माहात्म्य सांगताना श्री. आव्हाड यांनी सांगितले, ''विष्णूच्या मंदिरासमोर संभाजीराजांना अटक केली, पण औरंगजेबाने विष्णूचे मंदिर तोडले नाही.'' या एका पुराव्याने औरंगजेबास क्रूर नसल्याचे व थोर मानवतावादी असल्याचे प्रमाणपत्र आव्हाड यांनी दिले व बहुधा त्याचमुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांना धारेवर धरताना औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेबजी' असा केला. पण मला तेच एकमेव कारण दिसत नाही. औरंगजेबास 'माननीय' किंवा 'औरंगजेबजी' ठरवण्यामागे भाजप नेत्यांची मानसिकता अशी की, औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. जन्माच्या वेळी औरंगजेबाचे 'पिताश्री' गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी त्याचा उल्लेख 'औरंगजेबजी' असा केला असावा! मागे एकदा काँग्रेसच्या नेत्याने अफझल गुरूचा उल्लेख 'अफझल गुरूजी' असा करताच याच भाजपने राष्ट्रवादाच्या नावाखाली धुमाकूळ घातला होता.
मोदींनी सांगितला औरंगजेब कोण?
औरंगजेबजी यांच्याविषयी आपले पंतप्रधान मोदीजी यांनी एक जोरदार भाषण लाल किल्ल्यावरून केले. त्यास पंधरा दिवसही झाले नाहीत. मोदी यांनी 26 डिसेंबर रोजी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर भाषण केले. शिखांचे सर्वोच्च गुरू गोविंदसिंह यांच्या मुलाच्या हौतात्म्याच्या निमित्ताने वीर बाल दिवसाचे आयोजन करण्यात आले. त्यातले मोदींचे भाषण श्री. आव्हाड व बावनकुळे यांनी समजून घेतले पाहिजे. मोदी यांनी औरंगजेबावर अदृश्य तलवार चालवली. ''औरंगजेबाला भारताचा इतिहास बदलायचा होता. औरंगजेबाच्या आतंकशाहीविरोधात गुरू गोविंदसिंह पहाडासारखे उभे राहिले. औरंगजेब व त्याचे लोक गुरू गोविंदसिंह व त्यांच्या मुलाचे जबरदस्तीने धर्मांतर करू इच्छित होते, पण गुरू गोविंदसिंहांच्या साहेबजाद्यांनी हौतात्म्य पत्करले, पण औरंगजेबाच्या तलवारीपुढे शरणागती पत्करली नाही. एका बाजूला औरंगजेबाचा आतंकवाद व दुसऱ्या बाजूला गुरू गोविंदसिंहांचा अध्यात्मवाद अशी ही लढाई होती. एका बाजूला कट्टर धर्मांधता व दुसऱ्या बाजूला मानवतावाद, उदारतावाद. एका बाजूला लाखोंची फौज, दुसऱ्या बाजूला गुरू गोविंदसिंहांचे साहेबजादे त्यांच्या निश्चयापासून जराही ढळले नाहीत व त्यांनी देश-धर्मासाठी बलिदान स्वीकारले.'' औरंगजेब व त्यांच्या आक्रमक फौजेपुढे न झुकण्याची प्रेरणा गुरू गोविंदसिंह व त्यांच्या वीर पुत्रांनी दिली. गुरू गोविंदसिंहांचे चारही पुत्र शहीद झाले. औरंगजेबाच्या आदेशाने मोगल सेनेने या वीर पुत्रांना फक्त सहा आणि नऊ वर्षांच्या कोवळय़ा वयात हौतात्म्य दिले, हा इतिहास आहे. तेव्हा औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता असे कसे म्हणायचे? पुन्हा बावनकुळय़ांचे 'सन्माननीय औरंगजेबजी' प्रकरण पंतप्रधान मोदींजी यांनाही न पटणारे आहे.