मुंबई - केरळमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी केली. आपल्या फेसबुक पोस्टवरुन मंत्री बिंदू यांनी या निर्णयाची माहिती दिली. केरळ सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असून महाराष्ट्रातही असा निर्णय लागू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन केली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मेन्शन केलं आहे.
कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या SFI-नेतृत्वाखालील विद्यार्थी संघटनेने मासिक पाळी रजेसाठी मोहिम राबवली. त्यानंतर तेथील सरकारने मासिक पाळीचा निर्णय घेतला. विद्यार्थिनी व नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळी रजा लागू करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. देशभरातील शैक्षणिक संस्था व कार्यालयांना मासिक पाळीची रजा देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवरील निर्णय येण्यापूर्वीच केरळ सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थिंनींसाठी मासिक पाळीची सुट्टी जाहीर केली आहे. याआधी बिहार सरकारनेही मासिक पाळी रजा जाहीर केली आहे. त्यानंतर, आता जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकारकडेही हा निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, झोमॅटो, बायजूस् कंपन्यांमध्ये मासिक पाळीसाठी भरपगारी रजा दिली जाते. त्यामुळे केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण अन्य राज्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मासिक पाळीच्या काळात मुलींना विशेषत: शाळकरी विद्यार्थिनींना त्यांच्या सर्व त्रासांची चांगलीच जाणीव होते. मासिक पाळीदरम्यान महिला विद्यार्थिनींना येणाऱ्या मानसिक आणि शारीरिक अडचणी लक्षात घेऊन सर्व विद्यापीठांमध्ये मासिक पाळी लागू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी सातत्याने केली जाते,