मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्स (सदनिका) जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईनंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सूचक विधान केलं होतं. त्यावरुन, आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
PMLA कायद्यानुसार ईडीने ठाण्यात ही कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतेमंडळी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया आल्या. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंधू असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. आव्हाडांच्या या विधानावरुन भाजपचे मित्रपक्ष असलेले आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले होते आव्हाड
"राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. राज्य सरकारने काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणाला तुरूंगात डांबलेलं नाही. आता आज झालेल्या कारवाईनंतर अशा गोष्टींवर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल हे नक्की. पण माझं मत सांगायचं तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही", असं अतिशय मोठं आणि सूचक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. तसेच, राज्याने कुणावरही कधी अशी सूडबुद्धीने कारवाई केलेली नाही. कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालेलं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे. विरोधकांनी सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करायला हरकत नाही. पण ते अशा माध्यमातून करावं हे चुकीचं आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं.