मुंबई- रायगडाच्या पायथ्याशी झालेलं दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असताना पुण्याच्या सदाशिव पेठेत तशीच धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग सुरू केला होता. तरुणापासून आपली जीव वाचवण्यासाठी ती तरुणी वाचवा... वाचवा... असा आक्रोश करुन भररस्त्यात धावत होती. त्याचवेळी, एक युवक जीवाची बाजी लावून पुढे सरसावली आणि आणखी एका तरुणाच्या मदतीने तरुणीचा जीव वाचला. मुलीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांची नावे लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील अशी आहेत. या तरुणांच आता राज्यातून कौतुक होत आहे. माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही कौतुक करत त्यांना बक्षीस जाहीर केलं आहे.
पुण्यातील घटनेनंतर अजित पवार संतापले, ताई-दादांचा गृहमंत्र्यांवर निशाणा
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल...!!, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी दहा वाजण्याच्या पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तरुणी जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेचा थरार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिनेस्टाईल थरारक घटनेत जखमी तरुणीसाठी दोन तरुणांनी जीवाची बाजी लावली. त्यामुळे, तरुणीचा जीव वाचला.
या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे, एकीकडे दिवसाढवळ्या ही घटना घडत असताना लोक केवळ बघ्याची भूमिका घेत होती. राजधानी दिल्लीतही काही दिवसांपूर्वी अशीच एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे, विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात काय चाललंय, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गृहमंत्र्यांना वेळ नाही का, असा सवाल विचारत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.