Jitendra Awhad: सुपारीचं व्यसन वाईट! जितेंद्र आव्हाडांनी 'नाव न घेता' कोणावर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:08 AM2022-04-04T09:08:32+5:302022-04-04T11:02:58+5:30
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांची भाषणे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले.
मुंबई - गुढी पाडव्यादिवशी मनसे आयोजित मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत अनेकांवर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांची भाषणे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच, राज यांनी मदरशांवर धाडी टाकण्यासंदर्भात केलेल्या टीकेवरुनही आव्हाड यांनी राज ठाकरेंना खुलं आव्हानं दिलं आहे. मुंब्र्यातील मदरशांमध्ये वस्तारा जरी सापडला, तरी आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हाड म्हणाले. राज ठाकरेंच्या भाषणापासून सोशल मीडियावर राज ठाकरे ट्रोल होत आहेत. तर, अनेक नेतेमंडळीही सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका करत आहेत. आव्हाड यांनी 3 एप्रिल रोजी 9.29 मिनिटांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये, त्यांनी कुणाचाही उल्लेख केला नाही. मात्र, त्यांच्या ट्विटचा रोख राज ठाकरेंच्या भाषणाकडे असल्याचे दिसून येते.
सुपारीचं व्यसन वाईट!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2022
सुपारीचं व्यसन वाईट! या एका वाक्यातच त्यांनी ट्विट केलं आहे. आव्हाड यांच्या या ट्विटला आलेल्या वाचकांच्या प्रतक्रियांवरुन त्यांच्या ट्विटचे लक्ष्य राज ठाकरेच असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण, अनेकांनी ट्विटरला रिप्लाय देताना, राज ठाकरेंचाच संदर्भ घेतला आहे. तर, काहींनी आव्हाड यांच्यावर टीका करताना शरद पवार यांच्याकडेही बोट दाखवले आहे.
दरम्यान, राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत, की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात. त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला, हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, अशा शब्दात आव्हाडांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
ब्लू प्रिंट देणारे राज हेच आहेत का?
लाखोंच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणे फार सोपे असते. पाच वर्षांपूर्वी जे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करायचे की, असे उद्योग आणले पाहिजेत तसे उद्योग आणले पाहिजे. कधी रतन टाटाशी चर्चा, कधी गोदरेजशी चर्चा, कधी यांच्याशी चर्चा कधी त्यांच्याशी चर्चा, असे एक विकासाचे मॉडेल घेऊन पोरांना नोकऱ्या लावतो, असे म्हणायचे. ब्लू-प्रिंट देणारे राज ठाकरे आता त्याच पोरांना मशिदीच्या बाहेर भोंगे लावण्यास सांगतात. ही विचारांची प्रगती आहे की अधोगती आहे हे समजत नाही, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तके वाचायला हवी
राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. दंगल कशाला म्हणतात हे राज ठाकरे यांना माहिती नाही. राज ठाकरे यांनी आजोबांची म्हणजेच प्रबोधनकारांची पुस्तके वाचायला हवी होती. त्यांना जात पात काय असते हे समजले असते आणि जात-पातचे जन्मदाते कोण आहेत हेही समजले असते. जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे. छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते आता राज्याचे अन्न नागरीपुरवठा मंत्री आहेत. तटकरे लोकसभेत खासदार आहेत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणे हे शरद पवारांचे आवडते काम आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले