Join us  

Jitendra Awhad: दंगल माजवण्यासाठीच 'भोंगा' निर्माण केलाय, आव्हाडांचा जोरदार प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 4:39 PM

मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत.

मुंबई - भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे. भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व देऊ नका. त्यापेक्षा, नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का? याकडे लक्ष द्या असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहिजे. समाज व धर्म कोणताही असो सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वांना ऐकावेच लागतील, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत. येत्या 3 मे रोजी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भोंगा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणाच त्यांनी केलीय. त्यामुळे, पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित झाला असून आव्हाड यांनी भोंगा या मुद्द्याला अधिक महत्त्व देऊ नका असे म्हटले आहे. 

महागाई किती वाढलीये याबद्दल कुणी बोलत नाही. पेट्रोलचे दर १२५ रुपयांवर गेलेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. २०१४ रोजी पेट्रोलचा दर ७१ रुपये होता. त्यावेळी ४१० रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज हजाराच्यावर आहे. पेट्रोल-डिझेल-सीएनजी महाग झाल्यामुळे दळणवळण महाग होतं त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढतात असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. आता लोकांनीच समजून घ्यायला हवे. उद्या घराच्याबाहेर सामान्य लोकांची मुलं जाणार आहेत. धर्म कोणताही असो पण दगडाला दगड लागून त्यातून अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीत कोणत्याही नेत्याचं मुल जळणार नाही, पण तुरुगांत मात्र सामान्य माणसाची मुलं खितपत पडतील. या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे हा प्रकार मला तरी अमान्य असल्याचे आव्हाड म्हणाले.

8 दिवस पुरेल एवढाच कोळसा

आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना निदर्शनास आले की, भारतात केवळ आठ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. हे काय दर्शविते? आज जर आपण कोळसा व्यवस्थित जमवला नाही. तर हा देश कमीत कमी १४ तास अंधारात राहिल. श्रीलंकेची महागाई आणि आपल्या महागाईत केवळ १७ टक्क्याचा फरक आहे. या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर पुढच्या काळात आपली श्रीलंका होणार नाही, याची काळजी सर्व पक्षांनी, धर्मांनी, माणसांनी घेतली पाहिजे. आता हिंस्र श्वापदे जर तुमच्या अंगात येत असतील तर कुणीच काही करु शकत नाही असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. 

निर्मला सितारमण यांचं विधान बेजबाबदार

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाच्या महागाईबाबत बोलताना संतापजनक प्रतिक्रिया दिली. याचाही समाचार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. हे लोक बेफिकीरी दाखवतायत, याचे कारण जर आपण धर्माचा द्वेष पसरवला तर आपण काहीही करु शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. २०१४ रोजी ७१ रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल आज सव्वाशे रुपयांवर आलेले असताना अर्थमंत्री बोलणार नसतील तर आपण काय बोलणार? असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमनसेराज ठाकरेमहागाई