मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे ट्विटरवर फार सक्रीय असतात. आपल्या कार्यक्रमांची, विकासकामांची माहिती ते येथून देतात. तसेच, एखाद्या विषयावर परखडपणे मत मांडतात. जातीव्यवस्था, पुरोगामी-प्रतिगामी, हिंदुत्व अशा विषयांवरही ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या चित्रपटातील भूमिकेवरही स्पष्टपणे भाष्य केलं होतं. आता, आव्हाड यांचं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी देशातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारे विचार ट्विटवरुन व्यक्त केले आहेत. त्यामध्ये, देशाच्या राष्ट्रपतींच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे केवळ जातीव्यवस्थेमुळे दलित व्यक्तीला आजही समाजात कमी लेखण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष्य वेधले आहे. ''दलित माणूस या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो ही संविधानाने दिलेली देणगी आहे. दलित माणूस आपल्या लग्नात घोड्यावर बसू शकत नाही ही जातीव्यवस्थेची करणी आहे!'' असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांचे हे ट्विट नेमकं कोणत्या घटनेशी रिलेट करतं हे सद्यस्थितीत सांगता येणार नाही. मात्र, येथील जातीव्यवस्थेवर प्रहार करण्याचं काम त्यांनी या ट्विटमधून केलं आहे.
आव्हाड यांच्या या ट्विटरवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्यांच्या ट्विटरला उत्तर देताना काहींनी जातीवादाचे बीज पेरू नका, असा टोलाही लगावला आहे. दरम्यान, आव्हाड यांनी संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतानाह जातीभेदावर प्रहार केला होता. त्यावेळी, अभंगाच्या दोन ओवीही त्यांनी शेअर केल्या होत्या.
जाति-जाति में जाति है,जो केतन के पात,रैदास मनुष ना जुड़ सके,जब तक जाति न जात..!
तत्कालीन समाजव्यस्थेत शूद्र मानल्या जाणाऱ्या समाजाचा प्रत्येक घटक सुखी व्हावा, एकमेकांप्रति आदर निर्माण व्हावा अशी समाजवादाची तुतारी फुंकणारे, संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!