Jitendra Awhad: "महाराष्ट्र पेटवू नका, पेट्रोल-डिझेल महागलंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:26 AM2022-04-05T09:26:00+5:302022-04-05T09:37:02+5:30
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांची भाषणे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले
मुंबई - गुढी पाडव्यादिवशी मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत अनेकांवर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आणि मदरसे व मशिदींवरील वक्तव्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तर, सातत्याने ट्विट करुन ते राज यांच्यावर प्रहार करत आहेत.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांची भाषणे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच, राज यांनी मदरशांवर धाडी टाकण्यासंदर्भात केलेल्या टीकेवरुनही आव्हाड यांनी राज ठाकरेंना खुलं आव्हानं दिलं आहे. मुंब्र्यातील मदरशांमध्ये वस्तारा जरी सापडला, तरी आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर, आता आव्हाड यांनी हात जोडून राज यांना विनंती केली आहे.
राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 4, 2022
कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय.
त्यांच्या खिशात पैसे नाहीयत.गॅस पेट्रोल डिझेल महागलंय
भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत
''राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय. त्यांच्या खिशात पैसे नाहीत. गॅस, पेट्रोल, डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय, याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत?'' असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंच्या भाषणापासून सोशल मीडियावर राज ठाकरे ट्रोल होत आहेत. तर, अनेक नेतेमंडळीही सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका करत आहेत. आव्हाड यांनी ट्विटरवरुन राज यांच्यावर टीकांचा भडीमार सुरू केला आहे. 3 एप्रिल रोजी 9.29 मिनिटांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये, त्यांनी कुणाचाही उल्लेख केला नाही. मात्र, त्यांच्या ट्विटचा रोख राज ठाकरेंच्या भाषणाकडे असल्याचे दिसून येते. सुपारीचं व्यसन वाईट! या एका वाक्यातच त्यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर, महाराष्ट्र पेटवू नका, असे म्हणत पुन्हा राज यांना लक्ष्य केलं. तसेच, लाव रे तो व्हिडिओ पासून आता लाव रे हा व्हिडिओ.. असे म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंना आरसा दाखविण्याचं काम केलंय.
लाव रे तो विडिओ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 4, 2022
आता
लाव रे हा विडिओ
दूध का दूध पानी का पानी