नवी दिल्ली - १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला बुधवारी २२ वर्षे झाली... शहीदांना आदरांजली वाहून संसदेचे कामकाज सुरू झाले आणि काही वेळातच संसदेत घुसकोरी झाली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या, घोषणाबाजी केली. स्मोक क्रॅकर फोडून धूर केला... देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. यातील चौघांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एकजण लातूर जिल्ह्यातील चाकुरचा आहे. अमोल शिंदे असं या युवकांचं नाव असून तो पोलीस व सैन्य भरतीची तयारी करत होता, अशी माहिती समोर आली आहे. यावरुन आता त्यांच्या कृत्याला शासकीय व्यवस्थाच कारणीभूत असल्याची टीका सरकारवर होत आहे.
चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने चार दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. गेल्या सहा महिन्यात तो तीन-चार वेळा दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. तो सैन्य भरतीसाठी अनेकदा बाहेरगावी जात असे, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून समोर आली आहे. शिक्षण शिकूनही, रनिंगमध्ये पहिलं येऊनही भरती होत नाही, म्हणून तो व्यथित होता, असे त्याच्या आईने म्हटले. अमोलच्या आई-वडिलांनी मीडियासमोर त्याची व्यथा मांडली. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, या घटनेची दुसरी बाजू मांडत अमोल आणि त्याच्या सहकाऱ्यांना हे कृत्य करण्यास व्यवस्थेनंच भाग पाडलंय, असे म्हटलं आहे.
देशाच्या संसदेत जो प्रकार घडला त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्या कृतीचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि मी स्वत: ते करत नाही, हे सर्वप्रथम इथे नमूद करू इच्छितो, असे म्हणत आव्हाड यांनी दुसरी बाजू मांडली. ''ज्या तरूणाने हे कृत्य केलं तो अमोल शिंदे, महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याने या प्रकरणाची दुसरी बाजूही जाणून घ्यायला हवी. मी इथे शेअर केलेला व्हिडिओ अमोलच्या आई-वडिलांचा आहे. आपला मुलगा शिकलेला आहे आणि अनेक वर्ष नोकरीसाठी धडपडतोय, असं ते सांगतायत. खेळात चांगली कामगिरी करूनही पोलिसात भरती होता आलं नाही आणि काही लोकं लाखभर रूपये भरून भरती होतायत. राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या वास्तवाकडे दुर्लक्ष कसं करणार?'', असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.
आज अमोलने जो गुन्हा केलाय,त्यासाठी व्यवस्था त्याला शिक्षा देईल. मात्र, ज्या व्यवस्थेने त्याला हे करायला भाग पाडलं, त्याला कोण आणि कशी शिक्षा करणार?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
सरकारविरुद्ध नाराजी
अमोलने सांगितले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनासारख्या मुद्द्यांवर आपण नाराज आहोत. मणिपूरचे संकट, बेरोजगारी हे मुद्देही आहेत. म्हणूनच आपण हे पाऊल उचचले.
चौघांची सोशल मीडियावर ओळख, मग कट
चार आरोपी एकमेकांना ओळखतात. हे चौघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांनी संसदेवर हल्ल्याची योजना आखली. या आरोपींना आश्रय देणाऱ्या विकी शर्मा व त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. ललित झा घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
खासदारांच्या पीएचे पास रद्द
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेबाबत अनेक बैठका घेतल्या व संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी प्रेक्षक गॅलरीचे सर्व पास रद्द केले. सर्व विद्यमान व माजी खासदारांच्या पीएचे पासही रद्द केले.
सुरक्षेबाबात महत्त्वाची बैठक
संसदेतील घुसकोरीच्या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची बैठक घेतली. दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी ओम बिर्ला यांच्याशी या संपूर्ण घटनाक्रमाबाबत चर्चा केली. त्यानंतर पोलिस, आयबी, फॉरेन्सिक, एनआयसह सरकारच्या सर्व सुरक्षा एजन्सीजनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला.