गीतापठणावरून झाली फजिती अन् जितेंद्र आव्हाडांना आठवल्या जाती-पाती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 03:13 PM2018-07-13T15:13:08+5:302018-07-13T15:16:26+5:30

भगवद्गीता म्हणताना झालेल्या घोळानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जातीचा आधार घेतल्याचं पाहायला मिळतंय.

Jitendra Awhad facebook post after raw over bhagwatgita in nagpur monsoon session | गीतापठणावरून झाली फजिती अन् जितेंद्र आव्हाडांना आठवल्या जाती-पाती!

गीतापठणावरून झाली फजिती अन् जितेंद्र आव्हाडांना आठवल्या जाती-पाती!

googlenewsNext

मुंबईः श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेवरून नागपूर अधिवेशनात गुरुवारी चांगलंच महाभारत रंगलं होतं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गीतेच्या प्रतींचं वाटप केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी शिक्षण विभागाला लक्ष्य केलं. पण, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना घाम फुटण्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचीच फजिती झाली. किंबहुना, त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. पण आता त्यांनी आपल्या फजितीचं खापर जातीव्यवस्थेवर फोडलंय.  

'भाजपा गीतेच्या आधारावर राजकारण करत असेल तर त्यांच्यापेक्षा जास्त गीता मला तोंडपाठ आहे', असं अतिविश्वासाने सांगत जितेंद्र आव्हाड यांनी काल 'बाईट' देताना थेट गीतापठण सुरू केलं होतं. पण, 'यदा यदा ही धर्मस्य' ऐवजी 'यदा यदा सी धर्मस्य ग्लानिर्भवती भारत...' असा घोळ झाला आणि आव्हाड गडबडले. त्यांनी चलाखीने विषय बदलायचा प्रयत्न केला, पण एका वार्ताहरानं त्यांना नेमकं पकडलं. अजून थोडे श्लोक म्हणून दाखवता का, या त्याच्या प्रश्नावर आव्हाड चिडले. 'भाजपाचे प्रवक्ते आहात का', 'बाजूला या म्हणून दाखवतो', 'मुर्खासारखे प्रश्न विचारतात', या त्यांच्या वाक्यांतून त्यांचा राग स्पष्ट जाणवत होता. त्यावरून त्यांचं पार हसं झालं. 

या प्रकारानंतर, आता स्वतःचा बचाव करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जातीचा आधार घेतल्याचं पाहायला मिळतंय. आज फेसबुकवर त्यांनी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. 'गीतेचा नवा अध्याय सुरू होतोय बहुजना सावध हो!' या मथळ्याखाली लिहिलेल्या पोस्टमध्ये मनुवाद, वेद-शास्त्र, हिंदू धर्म यावर त्यांनी आपली नेहमीची जहाल मतं मांडली आहेतच, पण 'वंजारी समाजात जन्मलेल्या आव्हाडांच्या जितेंद्रचं संस्कृतवर प्रभुत्व कसं असणार बुवा?', असा प्रश्नही त्यांनी केला आहे. 'आव्हाडांच्या शेकडो पिढ्यांमध्ये माझे वडील पहिले पदवीधर. बरं, संस्कृत शिकला तर ब्राह्मणेतराला मृत्युदंडाची शिक्षा होती. आंबेडकरांच्या 'शूद्र कोण होते' हे पुस्तक वाचायची तसदी घेतली तर हे समजेल', असा दावाही केलाय. परंतु, गीता तोंडपाठ असल्याचा दावा आपण स्वतःच केला होता, याचा त्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतोय. आव्हाडांनी स्वतःच 'यदा यदा' सुरू केलं होतं, हे व्हिडीओमध्येही दिसतंय. त्यामुळे गीतेचा नवा अध्याय म्हणत आव्हाडांनी जातीचा जुनाच अध्याय पुन्हा वाचलेला दिसतोय. 

Web Title: Jitendra Awhad facebook post after raw over bhagwatgita in nagpur monsoon session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.