मुंबई - निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडील राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज गुरुवारी निर्णय होणार आहे. नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत.तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये शाब्दीक वार सुरू झाल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करतात. आता, पुन्हा एकदा त्यांनी गद्दार म्हणत अजित पवारांना लक्ष्य केले.
जितेंद्र आव्हाड यांनी पुतण्या गद्दार म्हणत अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आव्हाड यांच्या बोचऱ्या टीकेला अजित पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूड पडल्यानंतर अजित पवार यांना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून टार्गेट केलं जात आहे. यापूर्वीही त्यांनी अजित पवारांच्या विधानाचा संदर्भ देत, त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यावर, ध चा मा.. करणाऱ्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही, असे म्हणत अजित पवारांनी आव्हाडांवर बोलणं टाळलं होतं. आता, पुन्हा एकदा आव्हाडांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली आहे. त्यास, आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे.
आव्हाड यांनी ट्विट करुन, पुतण्या गद्दार निघाला असं म्हणत कविता अजित पवारांना उद्देशून कविता केली. त्यावर, अमोल मिटकरी यांनीही शेरो-शायरीतून पलटवार केला आहे.
''कारण पुतण्या गद्दार निघाला वेळ अशी येईल की, वेळ येईल विचारण्याची काका का असे करता, माफ करा चुकी झाली आणि ह्या वेळेस २०१९ सारखी माफी नाही.गद्दारांना माफी नाही !
असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे, त्यांच्या या टीकेला अमोल मिटकरी यांनी तथाकथित पुरोगामी म्हणत आव्हाडांवर पलटवार केला.
बेशक उंगली उठा मेरे किरदार पर l शर्थ ये है, तेरी उंगली बेदाग होनी चाहिये ll#तथाकथितपुरोगामी
असे शायरीतून प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना दिले आहे. एककीडे राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर आज राष्ट्रवादीतील आमदार अपात्रेतेच्या निकालावर निर्णय येत आहे. तत्पूर्वी दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची सुरू झाल्याचं दिसून येतंय.