झोपडपट्टी पुनर्विकासात ‘राहील त्याची मालकी’- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 03:30 AM2020-02-07T03:30:46+5:302020-02-07T03:31:06+5:30

झोपडपट्ट्यांचे ड्रोन सर्वेक्षण

Jitendra Awhad says will still own in the slum redevelopment | झोपडपट्टी पुनर्विकासात ‘राहील त्याची मालकी’- जितेंद्र आव्हाड

झोपडपट्टी पुनर्विकासात ‘राहील त्याची मालकी’- जितेंद्र आव्हाड

Next

मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत जी व्यक्ती झोपड्यांमध्ये राहते त्याच व्यक्तीला घराची मालकी देण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केली. खात्याचा कारभार स्वीकारल्यापासून गेल्या तीस दिवसांत घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी या नव्या धोरणाची माहिती दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले की, अनेक झोपडपट्ट्यांमध्ये लोकांनी आपली घरे भाड्याने दिली आहेत. केवळ पुनर्विकास प्रकल्पात लाभ घेण्यासाठी हे झोपडीमालक परततात. त्यामुळे यापुढे जो झोपडीत राहील त्याच्याच मालकीचे घर होईल. झोपडीतील भाडेकरूंनाही पुनर्वसनाचा लाभ मिळावा. यासाठी झोपडीत प्रत्यक्षात वास्तव्य करणाºया व्यक्तीलाचघर दिले जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील एकूण सात महानगरपालिका आणि आठ नगरपालिका क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही आव्हाड यांनी या वेळी सांगितले. झोपु योजनेत आता पार्किंगची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच ठाण्यात कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

योजनेतील इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी गुणवत्ता कक्षाची निर्मिती करण्यात येईल. भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर एका महिन्यात घरे प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे विकासकाला अनिवार्य राहील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
वॉर्ड अधिकारी, पोलीस निरीक्षकांचीही देखरेख!

झोपड्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी आता झोपड्यांचे सर्वेक्षण ड्रोनचा वापर करून करण्यात येणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून झोपड्यांची संख्या फ्रीज करण्यात येईल. त्यामुळे अतिरिक्त वाढणाºया झोपड्या डिजिटल मॅपच्या माध्यमातून लगेचच लक्षात येतील. झोपडी परिसराची एक निश्चित सीमा आखणे ड्रोनच्या सर्वेक्षणामुळेच शक्य होणार आहे. ड्रोन सर्वेक्षण झालेल्या परिसरात झोपड्या वाढू नयेत, यासाठी महापालिकेचा वॉर्ड आॅफिसर तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचीही देखरेख असणार आहे.

महापुरुषांवर कॉफीटेबल बुक!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कवी नामदेव ढसाळ, श्रीपाद अमृत डांगे यासारखे अनेक कवी, साहित्यिक चाळ संस्कृतीतून पुढे आले. मुंबई घडविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. गृहनिर्माण विभागातर्फे या महापुरुषांवर लवकरच एक कॉफीटेबल बुक तयार करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Web Title: Jitendra Awhad says will still own in the slum redevelopment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.