मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजप नेते आव्हाड यांना लक्ष्य करत असून त्यांनी ओबीसी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही केली जात आहे. आता, जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानात वापरण्यात आलेल्या महार या शब्दावरुन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेत पोलीस आयुक्तांना तक्रारी अर्ज केला आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पत्र लिहिले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, लोकायुक्त, महाराष्ट्र राज्य आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून फिर्याद दिली आहे. त्यानुसार, न्यायायाने महार-दलित या शब्दांना प्रतिबंध केला आहे, तरीही राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथील सावित्रीच्या लेकी कार्यक्रमात महार या आक्षेपार्ह शब्दाचा सार्वजनिकरित्या वापर करुन समुहाचा अपमान करण्याच्या उद्देशाने आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या आकांक्षेने हे भाष्य केले आहे. 4 जानेवारी 2020 रोजी 11.34 वाजता ते एबीपी माझावर प्रसारीत झाले आहे. आव्हाड यांनी अनुसूचित जातीतील सदर वर्ग हा किती खालच्या स्तराचा आहे, हे दर्शविण्याच्या उद्देशाने जातीवाचक शब्द वापरले आहेत. तसेच इतर मागासवर्गीयांनाही अपमान करण्याच्या उद्देशाने वक्तव्य करणे हे संविधानिक मंत्री पदावर असलेल्या मंत्र्यांकडून झालेला गंभीर अपराध आहे. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये जाण्यास प्रतिबंध करावा. कारण, ते जातीय दंगल भडकविण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता, गलिच्छ राजकारण करण्याच्या मानसिकतेत आहेत, असे सदावर्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
काय म्हणाले होते आव्हाड
एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, खरे तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. मंडल आयोगाच्या मागण्यासाठी जेव्हा लढायचे होते तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींना लढायचेच नव्हते. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की, आपण श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटते. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसते घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावे लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
चंद्रशेखर बावनकुळेंनी साधला निशाणा
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड नेहमीच धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिणवले गेले, ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही. जितेंद्र आव्हाडांनी असे वक्तव्य केल्याने त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. या मागचा बोलविता धनी कोण हे पाहावे लागेल. त्यांच्यासारख्या लोकांमुळेच आरक्षण गेले. मी त्यांचा निषेध करतो. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, अशा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.