मुंबई: कर्नाटकमधील उडुपीमध्ये हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेला वाद चांगलाच चिघळत चालल्याचे पाहायला मिळत आहे. बुरखा किंवा हिजाब घालून महाविद्यालयात येणाऱ्या काही विद्यार्थिनींना कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत तथाकथित भक्त भारताचे पाकिस्तान करतील, अशी घणाघाती टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी बुरखा घालून एका महाविद्यालयाच्या आवारात स्कूटीवर आल्याचे दिसत आहे. स्कूटी पार्क करून ही मुलगी महाविद्यालयात जात असताना काही विद्यार्थी भगव्या रंगाचे उपरणे हातात घेऊन ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहेत. तसेच ही मुलगी पुढे कॉलेजच्या इमारतीमध्ये जाताना ही मुले मुलीच्या मागोमाग घोषणा देताना जात असल्याचे दिसत आहे. पुढे आल्यानंतर ही मुलगीदेखील नंतर ‘अल्ला हो अकबर’ अशा घोषणा देताना दिसत आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी कॅप्शन देत निशाणा साधला आहे.
तथाकथित भक्त भारताचे पाकिस्तान करतील
जेव्हा एक मुस्लीम मुलगी पीईसी कॉलेजमध्ये आली, तेव्हा तिला अनेक विद्यार्थ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांनी भगव्या रंगाचे उपरणे अंगावर घेतल्याचे दिसत आहे. हे तथाकथित भक्त भारताचा पाकिस्तान करून सोडणार आहेत. हे राम, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.