Jitendra Awhad: श्रीराम पहिले तत्त्वज्ञान होते, आता साधन; आव्हाडांनी असं का म्हटलंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 08:49 AM2022-04-12T08:49:57+5:302022-04-12T09:08:05+5:30
देशभरात श्रीराम नवमीच्यानिमित्ताने तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मुंबई - देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. श्रीराम जन्मोत्सवासाठी ठिकठिकाणच्या राम मंदिरांवर आकर्षक रोषणाई आणि चौकाचौकांमध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांनंतर सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी या शोभायात्रांमध्ये मुस्लीम बांधवांनी पाणी वाटून एकतेचा संदेशही दिला. तर, काही ठिकाणी गालबोटही लागले. यावरुन, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.
देशभरात श्रीराम नवमीच्यानिमित्ताने तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांत १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रांही दिसून आल्या. शोभायात्रेदरम्यान नागरिकांसाठी पाणी, शरबत आणि महाप्रसादाचे स्टॉल लावल्याचे दिसले. त्यामध्ये, मुस्लीम बांधवांचाही सहभाग दिसून आला. तर, काही ठिकाणी गालबोटही लागले आहेत. आव्हाड यांनी 10 एप्रिल रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये, धारवाड येथील श्रीराम सेनेच्या गटाकडून मुस्लीम फेरीवाल्यास मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे श्रीराम नवमीदिवशीच ही घटना घडल्याने त्यांनी, हे राम... असे म्हणत खंत व्यक्त केली होती. त्यानंतर, आव्हाड यांनी आता आणखी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये, ''श्री राम पहिले तत्वज्ञान होते, आता ते साधन आहे'', असा आशय लिहिला आहे.
श्री राम पहिले तत्वज्ञान होते
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 11, 2022
आता ते साधन आहे #काळ_बदलला
श्रीराम जरुर म्हणा, पण लोकांना...
राज ठाकरेंच्या सभेनंतरही आव्हाड यांनी भूमिका मांडली होती. 'कोरोना संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय. त्यांच्या खिशात पैसे नाहीयत. गॅस महाग झालाय. पेट्रोल-डिझेल महागलंय, भाज्या, केरोसिन महाग झालंय. खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झालंय याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचं नाही ते इश्यू बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे', असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. गॅसबद्दल, पेट्रोल-डिझेल, महागाई याबद्दल बोला ना. ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला, श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना 'राम नाम सत्य है' बोलायला लावू नका असा विचार आव्हाड यांनी मांडला होता.