2 लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकते तर तुमचे पैसे का नाही? - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 06:47 PM2019-10-09T18:47:58+5:302019-10-09T19:08:52+5:30
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील राफेल विमानाच्या पुजेवरुन सरकारला टोला लगावला आहे.
मुंबई - अत्याधुनिक लढाऊ राफेल विमानाची दसऱ्याच्या मुहुर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. मात्र यावेळी विमानाच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्यामुळे सरकारवर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील राफेल विमानाच्या पुजेवरुन सरकारला टोला लगावला आहे.
पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी दोन लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या दरवाजाला लावून ठेवा. लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकतं तर तुमचे पैसे का नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार काही दिवसापूर्वी बंद करण्यात आले आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. त्यामुळे ग्राहक चिंतीत झाले आहेत. त्यामुळे पीएमसीच्या खातेदारांनी दोन लिंबू प्रत्येक शाखेच्या दरवाजावर लावा असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
#PMCBank च्या ग्राहकांनी 2-2 लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या मुख्य दरवाज्याला लावुन ठेवावा.. 2 लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकते तर तुमचे पैशे का नाही? 😂😂😂 pic.twitter.com/x98Uc3iXRa
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 9, 2019
जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून '#PMCBank च्या ग्राहकांनी 2-2 लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या मुख्य दरवाज्याला लावून ठेवावा.. 2 लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकते तर तुमचे पैसे का नाही?' असं ट्वीट केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही राफेल विमानाच्या पुजेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राफेलसारखं अत्याधुनिक लढाऊ विमान भारताच्या ताफ्यात दाखल करताना सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी! असंही म्हटलं आहे. वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपाच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीच नजर लागणार नाही असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या चमूमध्ये वशीकरण स्पेशालिस्ट, तांत्रिक-मांत्रिक - धनंजय मुंडे https://t.co/BA8QvNc8Ed#DhananjayMunde
— Lokmat (@MiLOKMAT) October 9, 2019
आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीविरोधात विरोधक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. मुंबईकरांनी आरेतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवायला हवा. पडणारं प्रत्येक झाड आपला एक आमदार पडेल, याची जाणीव सरकारला व्हायला हवी, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याआधी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. आरेतील पडणारं प्रत्येक झाड आपला एक आमदार पडणार याची जाणीव झाल्यावर सरकारची झाडं पाडण्याची हिंमत होणार नाही, असं आव्हाड म्हणाले होते. ट्विटरवरुन व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या आव्हाडांनी शिवसेना, भाजपावर जोरदार टीका केली. 'एकानं सांगितलं होतं आम्ही आरे पाडणार. दुसऱ्यानं म्हटलं होतं आरे पाडू देणार नाही. मात्र या दोघांनी मुंबईकरांना फसवलं. दोघंही काल एक झाले आणि आरेचं कारे, कारेचं आरे झालं. आता आदेश आलाय तोडा रे. मात्र आता यावर कोणीच बोलत नाही,' अशा शब्दांत आव्हाड यांनी परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना, भाजपाला लक्ष्य केलं होतं.