मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीहीमुंबईत हक्काचं घर असणार असल्याचं सांगितलं. तसेच सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. या घोषणेचं सभागृहातील आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. परंतु काही जणांनी याचा विरोध केला. मनसेच्या राजू पाटील यांच्यानंतर काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदेंनीही घर नाकारालं आहे. त्यानंतर, काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने ट्विट करुन घर नाकारलं. त्यास गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय.
काँग्रेस आमदार जिशान सिद्दिकी यांनी ट्विट करुन, महाराष्ट्र सरकारकडून देणाऱ्या येणाऱ्या मुंबईतील घराची मला गरज नसल्याचं म्हटलं. तसेच, वांद्रे इस्टमध्ये हजारो नागरिकांना घरं नाहीत, ते कठीण परिस्थितीत राहतात, अशा लोकांसाठी हा पैसा खर्च करावा, असेही सिद्दिकी यांनी म्हटलं आहे. त्यानंतर, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन त्यांस प्रत्युत्तर दिलं आहे. ''तुमच्याकडे 10 घरं आहेत, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. आणि ही योजना फक्त महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आमदारांसाठी असून मुंबईकरांना नाही. तसेच, ही घरे मोफत मिळणार नाहीत हेही तुम्हाला माहिती असेल, आशा आहे आता तुम्हाला समजलं असेलच,'' असेही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
काय म्हणाले अजित पवार
"काल मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मुंबईत सदनिका देणार असं म्हटलं. पण सगळ्यांना त्या फुकट देणार असंच वाटलं. त्याची काही किंमत आहे. सगळ्यांना ती घरं मिळणार नाही. मी माझी पत्नी यांच्या नावे घर मिळणार नाही. काही लोकप्रतिनिधी असे आहेत ज्यांना जनतेच्या कामानिमित्त मुंबईत यावं लागतं. पण मीडियानं कालपासून इतकं ठोक ठोक ठोकलंय की असं वाटतं गेला तो फ्लॅट. जे गरीब आमदार आहेत त्यांना ती घरं देण्याचा आपण प्रयत्न करतोय," असं अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलताना स्पष्ट केलं.
आव्हाडांचं स्पष्टीकरण
''आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.'', असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांनी आमदारांच्या घरांवरुन होणाऱ्या टीकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं होतं.