'निश्चितच तुझे हातपाय मोडले असते', जितेंद्र आव्हाडांना पोलीस अधिकाऱ्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 10:01 AM2020-04-09T10:01:04+5:302020-04-09T10:02:32+5:30
फेसबूकवर पोस्ट टाकल्याचा जाब विचारत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे
मुंबई - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ठाण्यातील अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. मात्र, आव्हाड यांनी एक ट्विट रिट्विट केलंय. त्यामध्ये, चक्क एका पोलीस उपनिरीक्षकानेच आव्हाड यांचे हायपाय तोडण्याची भाषा केल्याचं दिसून येतंय. सतिश कुलकर्णी नामक पोलीस उपनिरीक्षकाच्या कमेंटचा स्क्रीनशॉट सुहास गाडेकर यांनी ट्विट केला होता.
फेसबूकवर पोस्ट टाकल्याचा जाब विचारत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. वर्तकनगर पोलिसांनी तक्रारदार करमुसे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही चित्रण तसेच या घटनेशी संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरु केले आहे. बुधवारी दिवसभर यातील संबंधित अनेकांची त्यांनी चौकशी केली. यामध्ये मुंबई पोलीस दलातील सुरक्षा विभागातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा, तसेच काही कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याची प्राथमिक असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसे असेल, तर याची चौकशी होणार आहे. अर्थात, वर्तकनगर पोलिसांनी यासंदर्भात अधिकृरित्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात असमर्थता दर्शविली आहे. त्यानंतर, मंत्री आव्हाड यांनी एक ट्विट करुन एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याबद्दल वापरलेली भाषा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या पोस्ट वर कमेंट केली आहे त्या पोस्ट ची लिंकhttps://t.co/BViQS6i2N7
— Suhas Gadekar (@suhasg247) April 8, 2020
सतिश कुलकर्णी नामक पोलीस अधिकाऱ्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर दिसत आहे. आव्हाड यांनी रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये संबंधित PSI च्या फेसबुक अकाऊंटची लिंकही देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये स्वागरेट पोलीस स्टेशनचे पीएसआय सतिश कुलकर्णी यांचे आव्हाड यांच्याविषयची कमेंट बघा, जनेतेच सेवक आणि अधिकारी अशी भाषा वापरत असतील, तर यावर कारवाई अपेक्षित आहे, असे लिहिण्यात आले आहे. या ट्विटमधील कमेंटमध्ये, आव्हाडांना पोलीस अधिकाऱ्याकडून धमकी देण्यात आली आहे. 'अरे, तू एकट्याला १० ते १५ जणांना मारायला लावतोस, तू एकट्याने लढायला पाहिजे होतं. निश्चितच तुझे हात-पाय मोडले असते', अशी कमेंट दिसून येत आहे. आव्हाड यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे.
दरम्यान, फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यासमोर बेदम मारहाण केली. राजकीय वर्तुळातून आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी लोकमतशी चर्चा केली. एखाद्या मंत्र्याने अशा पध्दतीने कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला असता, आव्हाड म्हणाले की, मी कधीच कायदा हातात घेत नाही. तीन-चार दिवसांपासून सदर मनुष्य अश्लील शिविगाळ करत आहे. माझ्या मुलीवर, बायकोवर बलात्कार करणार, अशा धमक्या देतो. माझ्याच नावाचे फेक अकाऊंट तयार करतो. माझा दाभोळकर होणार म्हणून ट्विट केले जाते. एक माणूस अमरावतीवरुन येतो. तो सांगतो, आम्ही थेट गोळ्या घालतो डोक्यामध्ये, त्यामुळे कोण कायदा हातात घेतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. मुळात मी अशा पोस्टकडे कधीच लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे, हेच मी कार्यकर्त्यांनाही सांगत असतो.